स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 


       छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. त्या काळात बहुतेक राजे चैनविलासात रमलेले होते. महाराष्ट्रातील बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाहा आणि विजापूरचा आदिलशाह यांच्याकडे होता. त्या दोघांच्या भांडणात रयतेचे खूप हाल होत होते. हाता-तोंडाशी आलेल्या  पिकांची नासधूस केली जात होती. मंदिरे जमीनदोस्त  होत  होती. अशा काळात १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर  जिजाबाईंच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला.  पूर्वेच्या क्षितीजावर तो सोनेरी क्षण महाराष्ट्रासाठी नवी पहाट घेऊन उगवला. 

       शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई यांच्या पोटी जन्मलेले शिवाजी महाराज गरीब मावळ्यांच्या मुलांबरोबर खेळत लहानाचे मोठे झाले. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच रयतेच्या दुःखाची जाणीव झाली होता. त्यांनी रयतेच्या हाल अपेष्टा जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मनात रयतेच्या कल्ल्यानाची लालसा लहानपणीच जागृत झाली होती.त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. जिजाबाईंनी त्यांना रामायण, महाभारतातील कथा, साधू-संतांच्या कथा सांगून त्यांच्या मनात संस्कारांचे बिजारोपन केले होते.  या सर्वांतूनच स्वराज्य स्थापनेची पायाभरणी शिवाजी महाराजांच्या मनात झाली होती.

     शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय मनात पक्का केला होता. दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे शिक्षण झाले. शहाजीराजांनी शिवरायांसाठी विख्यात शिक्षकांची नेमणूक केली होती. उत्तम राज्यकारभार कसा करावा; शत्रुशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे. घोडे, हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे अशा अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या. १६४५ साली शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या मावळ्यांबरोबर स्वराज्याची शपथ घेतली. ‘ज्याचे किल्ले त्याचे राज्य’ हे शिवरायांनी ओळखले होते. यासाठी एखादा भक्कम किल्ला जिंकण्याचा शिवरायांचा मनसुबा होता. त्यांनी आपल्या निष्ठावान मावळ्यांना घेऊन योजना तयार केली. पूण्याच्या नैऋत्येस चौसष्ट किलोमीटरवर असलेला तोरणा किल्ला जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. बारा मावळातील किल्ल्यांमागून किल्ले शिवरायांनी ताब्यात घेतले. कोंढाणा, पुरंदर त्यापाठोपाठ रोहिडा असे महत्वाचे किल्ले ताब्यात घेतले. रायगडावर सन १६७४  ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. शिवराय हिंदवी स्वराज्याचे ‘छत्रपती’ झाले. महाराजांनी राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसविली. अष्टप्रधान मंडळ तयार केले. राज्यकारभाराची आठ विभागात विभागणी केली. शिवरायांनी प्रधानांना इनामे, वतने किंवा जहागीरी देण्याची प्रथा मोडीत काढली. त्याऐवजी त्यांनी रोख पगार दिला. 

        शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये पण घोडदळ आणि पायदळ असे दोन मुख्य विभाग केले. सैन्यामध्ये कडक शिस्त निर्माण केली. शिवाजी महाराज दूरदृष्टीने विचार करणारे राजे होते. भविष्यात आपल्याला समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रुशी सामना करणे भाग पडणार हे जाणून शिवाजी महाराजांनी सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज या समुद्रावरील शत्रूंच्या बंदोबस्तासाठी आरमार दल उभारले. म्हणूनच शिवाजी महाराजांना आरमार दलाचे जनक असे म्हणतात. त्यांनी सिंधुदुर्ग, विजयदूर्ग यांसारखे समुद्रकिल्ले बांधले. स्वराज्याच्या संरक्षणासाठी या किल्ल्यांचा खूप उपयोग झाला. त्यांनी गुप्तहेर खाते उभारले होते. या खात्याचा ‘बर्हिजी नाईक’ हा प्रमुख होता. शिवाजी महाराजांनी मुलखी कारभार ही चोख ठेवला होता. त्यांनी दुष्काळी प्रदेशात साऱ्यामध्ये सुट दिली होती. त्यांनी स्वराज्यातील जनतेच्या सुखाकडे जातीने लक्ष दिले होते. सामान्य जनतेच्या हातात पैसा खेळता रहायला पाहिजे तरच तो वापरात येतो आणि त्यायोगे अर्थव्यवस्था मजबूत राहते हे त्यांचे सुत्र होते. म्हणून ते नेहमी तळागाळापर्यंत चलनाचे वितरण होईल यासाठी आग्रही होते. शिवरायांनी आपल्या प्रजेवर मातेसारखी माया केली. सर्व जातिधर्मातील लोकांना स्वराज्यात स्थान दिले. त्यांना सर्व धर्मांचा आदर होता. ते साधुसंतांना फार मान देत. ‘सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे’ हा महाराजांचा बाणा होता. राज्यकारभारात मराठी शब्द वापरता यावेत यासाठी त्यांनी ‘राज्यव्यवहार कोश’ हा ग्रंथ तयार करून घेतला. बलाढ्य परकीय सत्तेपुढे ते कधीच नमले नाहीत. स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा यांच्या उत्कर्षांसाठी शिवराय आयुष्यभर झटत राहिले. ‘हिंदवी स्वराज्य’ हे शिवरायांचे स्वप्न होते. एका नव्या युगाचा निर्माता असे तेजस्वी शिवरायांचे व्यक्तिमत्व होते. म्हणून समर्थ रामदास स्वामी संभाजी राजांस लिहिलेल्या पत्रात म्हणतात,

           ‘शिवरायांचे आठवावे रूप।शिवरायांचा आठवावा साक्षेप।
शिवरायांचा आठवावा प्रताप।भुमंडळी।।’

4 thoughts on “स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज”

Leave a Comment