डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आपल्या भारतीय प्रजासत्ताकाचे ११ वे राष्ट्रपती होते. मद्रास राज्यातील रामेश्वरम या छोट्याशा बेटासारख्या गावात, एका मध्यमवर्गीय तमिळ कुटुंबात दि. १५ ऑक्टोबर १९३१ रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. ‘जीवनात कशीही परिस्थिती असली तरी जेव्हा आपण आपली स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द ठेवतो तेव्हा ती पूर्ण करूनच स्वस्थ बसतो’ अशी त्यांची शिकवण होती. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आवड होती. त्यांच्या वाचनामुळे तसेच त्यांच्या आई-वडिलांमुळे त्यांना प्रामाणिकपणा आणि दयाळू वृत्ती मिळाली. स्वयंशिस्तीचे संस्कार त्यांच्यावर झाले.डॉ. अब्दुल कलाम यांनी अनेक पुस्तके ही लिहिली आहेत. तसेच त्यांच्यावर लिहिली गेलेलीही शेकडो पुस्तके आहेत. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विषयी भारतातील प्रत्येकाच्या मनात आजसुद्धा भरपूर आदर आहे. १५ऑक्टोबर हा त्यांचा जन्म दिवस जगभर ‘जागतिक विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. तर महाराष्ट्रात तो ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
डॉ. अब्दुल कलाम यांचे व्यक्तिमत्व अनेक अर्थांनी विस्मयकारक आहे. या देशातल्या अंतराळ विज्ञानातल्या प्रगतीची गती आपण बघत आहोत. त्यामागे डाॅ. कलाम यांचे नेतृत्व अत्यंत महत्वाचे आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे एरोनाॅटिकल इंजिनिअर होते. एरोनाॅटिक्सचा डिप्लोमा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. यासाठी त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिणे गहाण ठेवले. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या ‘नासा’ या संशोधन संस्थेत चार महिने प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांची भारताच्या DRDO मध्ये निवड झाली.विज्ञानात क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमातंर्गत त्यांनी मोठं काम केलं आहे. त्यांच्या नेतृत्वातूनच ‘पृथ्वी’,’अग्नी‘ या क्षेपणास्त्रांचा जन्म झाला. क्षेपणास्त्र विकासातलं त्यांचं कार्य खूप मोलाचं आहे.म्हणून त्यांना ‘मिसाईल मॅन’ असे संबोधले जाते.विज्ञानातलं संशोधन त्यांनी अखंडपणे सुरू ठेवलं. एवढंच नव्हे तर आपल्यासमवेत कार्यरत असणाऱ्या वैज्ञानिकांना आणि संशोधकांना प्रोत्साहन दिले.
२००२ मध्ये डॉ.कलाम हे भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले.भारताचे राष्ट्रपती म्हणून त्या पदाची प्रतिष्ठा त्यांनी अधिक वाढविली. एकविसाव्या शतकातला भारत जगातील एक प्रगत देश म्हणून महत्त्वाचं स्थान प्राप्त करेल, याविषयी त्यांना मोठा आत्मविश्वास होता. देशातल्या तरुण पिढीशी थेट संवाद साधण्यासाठी डाॅ. कलाम संबंध देशभर व्याख्यानं देत फिरत राहिले.
भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण‘ व १९९८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम हे जनतेचे राष्ट्रपती होते, त्यांचे कार्य, त्यांचे विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात सतत तेवत राहतील, त्यांना माझा आदराचा सलाम !
त्यांचे विचार:- ‘स्वप्ने ती नाहीत जी आपण झोपेत पाहतो. स्वप्ने ती आहेत जी आपल्याला झोपू देत नाहीत’