माझा महाराष्ट्र
या महाराष्ट्राला फार थोर प्राचीन परंपरा आहे प्रत्यक्ष भगवान रामचंद्र आणि सिता माई यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. दोन हजार वर्षांची प्राचीन परंपरा लाभलेली संत महात्म्यांची ही भूमी. जितका रंजक इथला इतिहास तितकाच इथला निसर्ग वैविध्यपूर्ण. इथला कोकण किनारा, इथला समुद्र, इथला सह्याद्री पर्वत, इथली घनदाट अरण्य विविधतेने नटलेली आहेत. त्यांच्याच कड्या-कपारींतून वहाणाऱ्या भीमा, गोदावरी यासारख्या नद्या. या महान भूमीच्या पोटी जन्मलेली मुलेही महानच. अगदी इ.स. पूर्व कालखंडातील सातवाहन राजापासून आपले राज्य समृद्ध परंपरा लाभलेले राष्ट्र आहे . राजा कृष्ण पहिला याच्या कालखंडात बांधलेले कैलास मंदिर तर शिल्पकलेचे एक अद्भुत असे आश्चर्यच आहे. त्याचे अखंड दगडातील कोरीव काम आजच्या तंत्रज्ञानाच्या युगालाही समजत नाही. आतापर्यंतच्या ज्ञात राजसत्तांमध्ये सातवाहन राजघराण्यापासून वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूठ अशा राजसत्ता आपल्या महाराष्ट्राला लाभल्या. त्यांच्या काळात मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने पश्चिमेकडील देशांकडे निर्यात होत असत. त्यांच्या काळात पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर ही स्थळे व्यापारी केंद्र म्हणून विकसित झाली. इ.स. च्या नवव्या शतकात स्थापन झालेल्या देवगिरीच्या यादवांच्या काळात गोरक्षगीत, विवेकसिंधू, लीळाचरित्र, रुक्मिणी स्वयंवर अशा प्रकारच्या साहित्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला हातभार लावला. अशी समृद्ध प्राचीन परंपरा लाभलेले माझे राष्ट्र महाराष्ट्र.
संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम अशा अनेक थोर संतांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत हातभार लावला. त्यांच्या साहित्यातूनच शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेची पायाभरणी झाली. हा राकट, कणखर महाराष्ट्र कलाकारांचा देश देखील आहे. भारतातील पहिला चित्रपट देखील ह्याच भूमीत तयार झाला. मराठी साहित्य तर किती समृद्ध आहे. .याच महाराष्ट्राने चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, लोकमान्य टिळकां सारखे स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांसारख्या महान व्यक्तींना जन्म दिला. बालकवी, कुसुमाग्रज, वि.स.खांडेकर यांच्या सारखे अनेक साहित्यिक; बालगंधर्व,लता मंगेशकर अशी अनेक रत्ने या भूमीला लाभली. किर्लोस्करांसारखे अनेक उद्योजक याच भूमीत जन्मले. शाहू महाराजांसारखा लोकराजा याच महाराष्ट्राने दिला. अशा अनेक अमोल रत्नांनी ही भूमी समृद्ध झाली आहे
‘अभिमान वाटे मजला, माझ्या महाराष्ट्राचा
करतो लवून सलाम, त्यास मी हो मानाचा.’