मोबाईल शाप की वरदान

         मोबाईल शाप की वरदान

           पूर्वी निसर्ग हेच मनोरंजनाचे साधन होते. हवा, पाणी, ढग, आकाश, वृक्ष, चंद्र, सूर्य यांच्याभोवती गाणी गुंफली जायची. निसर्ग जस-जसा कमी होत चालला तसा प्रसारमाध्यमांचा संसर्ग वाढला. मनोरंजनाच्या विकृतीने संस्कृतीचे तीन तेरा झाले. रेडिओच्या शोधामूळे मनोरंजनाच्या क्षेत्रात क्रांती झाली. रेडिओमुळे लोकांच्या मनोरंजना बरोबरच त्यांच्या ज्ञानातही भर पडत होती. त्यानंतर टी.व्ही. आला, 24 तास चालणारे चॅनल्स आले.त्यानंतर आलेल्या कंप्युटरने तर जगच बदलून टाकले. 90च्या दशकात लागलेल्या इंटरनेटच्या शोधामूळे तर जग इतके बदलले व जवळ आले की जगाला ‘ग्लोबल व्हिलेज’ असे म्हटले जावू लागले.
             या मनोरंजनाच्या प्रत्येक साधनाबरोबर प्रत्येक पिढीचे निसर्गाशी असलेले नाते कमी-कमी होत चालले आहे. या सर्वांत कहर म्हणजे सध्या आलेल्या मोबाईलचा प्रसाराचा विळखा. या मोबाईलने अबालवृद्धांना वेड लावलय. तरुणाईला आणि लहान मुलांना तर याचं इतकं व्यसन जडलय की यातून अनेक सामाजिक व मानसिक समस्या निर्माण होवू लागल्यात.
या मोबाईलच्या वाढत्या व्यसनापुढे ज्ञान, माहिती, संस्कृती या गोष्टी दुय्यम ठरत आहेत. पूर्वी शाळेची बॅग फेकली की खेळ, गप्पा, अभ्यास असा क्रम असायचा.पण सध्या हा क्रमच बदललाय. मुलं तासनतास मोबाईलमध्ये गुंतून असतात. गप्पा तर लांबच. मुलांची खेळाची आवड कमी झालेय. विविध गेम्सच्या आहारी गेल्यामुळे विविध समस्या डोके वर काढू लागल्यात. मुलांच्यात मानसिक विकारांचा वेगाने प्रसार होवू लागला आहे.
             पण खरोखरच या नवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचे फक्त तोटेच आहेत का ? नाही. हे नवीन तंत्रज्ञान खूप उपयुक्त आहे. त्याचा योग्य उपयोग केला तर ते मानव जातीसाठी खूपच उपयुक्त आहे. मोबाईल हे जसे संवादाचे साधन आहे तसेच ते ज्ञान मिळवण्याचे,  आपत्कालीन परिस्थितीत योग्य मार्ग दाखविण्याचे तसेच आपल्याला हवी ती माहिती हवी तेव्हा देण्याचे इतके जलद माध्यम म्हणजे मानवासाठी एक देणगीच आहे. या देणगीचा आपण योग्य वापर करून मानव जातीचा विकास केला पाहिजे.

5 thoughts on “मोबाईल शाप की वरदान”

  1. खूप छान माहितीपूर्ण लेख. आज मोबाईल हेच सर्वश्रेष्ठ साधन बनलय. त्यामुळे वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे व आरोग्य बिघडत आहे. एकंदरीत छान माहिती पुरवली.

    Reply

Leave a Comment