भारत देश महासत्ता होणार का?

भारत देश महासत्ता होणार का?

आपल्या देशाचा मागील काही वर्षांचा इतिहास बघितला तर १९४७ नंतर आपल्या देशाची अर्थव्यवस्था हळू हळू विकसित होत गेली. सध्या भारत देशाची अर्थव्यवस्था झपाट्यानं विकसित होत आहे. ‘१९९१ च्या आर्थिक उदारीकरणाचे धोरण’ स्वीकारल्यानंतर तिचा विकास होण्यास अधिक वाव मिळाला. खरंतर भारताला स्वातंत्र्य मिळण्या पूर्वीपासून आपल्या देशातील अनेक महापुरुषांनी भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहिली होती. त्यामध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर, लालबहादूर शास्त्री अशी कितीतरी नावे सांगता येतील. आपले लाडके माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी देशाच्या विकासासाठी देशातील तरुणाईला खूप महत्त्वाचा घटक मानला आहे. भारतात सध्या तरुणाईचे प्रमाण ५१ टक्के पेक्षा जास्त आहे. वृद्धांचे प्रमाण फक्त १२ टक्के आहे यावरून आपल्या देशाच्या क्रियाशील लोकसंख्येचे प्रमाण जगाच्या इतर विकसित आणि विकसनशील देशांच्या पेक्षा कित्येक पटीने जास्त आहे हे लक्षात येते. याच तरुणाईवर आपल्या देशाचे महासत्ता होण्याचे स्वप्न अवलंब

तरुणाईचा उपयोग देश महासत्ता होण्यासाठी कसा करून घेता येईल? – आपला देश नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण आहे. लोकसंख्येचा विचार करता आपला देश जगाच्या दृष्टीने मोठी बाजारपेठ आहे. या नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन, संवर्धन आणि विकास करून तिच्या सहाय्याने व्यापार उद्योग यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आज सरकारने आणलेल्या Startup India सारख्या योजना तरुणांसाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. देशातील कितीतरी तरुण Startup मधून स्वतःचा उद्योग निर्माण करत आहेत. त्यांची सध्या कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे. पियुष बंसल हे ‘लेन्सकार्ट’ चे CEO आहेत. त्यांनी २०१० साली मित्रांच्या सोबतीने ‘लेन्सकार्ट’ ची स्थापना केली आज देशातल्या ७० पेक्षा जास्त शहरात लेन्सकार्ट ची दुकानं आहेत. आय.आय.टी. दिल्ली आणि आय.आय.एम. अहमदाबाद मधून शिक्षण घेतलेले अशनिर ग्रोवर यांच्या ‘भारतपे’ कंपनीची उलाढाल ७०० कोटींची आहे. या उद्योगांमुळे रोजगार निर्मिती पण भरपूर प्रमाणात झालेले आहे. आजच्या तरुणांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता स्वतःमधील कार्यकौशल्यांना वाव देऊन त्यांचा विकास केला पाहिजे. तरच आणि तरच देशातील बेरोजगारीची समस्या पण कमी होऊन देशाचा विकास होण्यास हातभार लागेल. सध्याचे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ पण यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हायस्कूल लेवल पासूनच शैक्षणिक अभ्यासक्रमात व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल विकासाला चालना मिळणार आहे. नवीन धोरणात ‘soft skills’ विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. यातून येणारी पिढी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप मोठे योगदान देणारी ठरावी ही या धोरणाची अपेक्षा आहे.

विकसित देशांचे रहस्य – विकसित देशातील नागरिकांना आपण विकसित आणि संपन्न देशात रहावं असं वाटत असतं. यासाठी ते सतत प्रयत्न, कष्ट करत असतात. त्यांच्यावर त्यांचा विश्वास असतो. ते प्रामाणिकपणे कष्ट करून स्वतःचे ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते यशस्वी होतात. त्यांच्या कष्टामुळे देश विकसित होतो. हीच त्यांची जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिकपणा प्रत्येक भारतीयाने अंगिकारली पाहिजे. ध्येय गाठण्याची अदम्य इच्छा आणि चिकाटी चकित करणारे काम हातून घडवू शकते. दुसऱ्या महायुद्धात जपान नेस्तनाबूत झाला होता. ५४ जपानी शहरांवर बॉम्बवर्षाव झाला होता. 30 लाख जपानी नागरिक मारले गेले तर त्यानंतरच्या काळात हजारो उपासमारीने मेले. १९४९ पर्यंत त्यांची अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीत होती. पण आज जपान श्रीमंत देशांपैकी एक आहे. हे जपानी सरकार आणि नागरिक यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे यश आहे.

भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दोन नंबरचा देश आहे. आपल्या सातत्याने आणि मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येला आधार देण्यासाठी आपल्याला लोकांचे जीवनमान सुधारणे गरजेचे आहे. यासाठी जास्तीत जास्त संपत्ती निर्माण करणे आवश्यक आहे. म्हणजेच आपली अर्थव्यवस्था वेगाने वाढण्याची गरज आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था २.५ टक्के एवढी सरासरी वाढत आहे. मग जर आपली अर्थव्यवस्था प्रतिवर्षी १० टक्क्यांनी वाढली तरच आपल्या देशातील गरिबी संपुष्टात येईल आणि आपला देश लवकरच विकसित राष्ट्र होऊ शकेल. आपल्या देशाचा आर्थिक विकास होत असताना आपल्याला आपल्या देशातील विषमता सुद्धा कमी केली पाहिजे. हे खरं आहे की उत्पन्नातील विषमता जगभरात सगळ्या देशांमध्ये असते. पण विकसित देशांमध्ये कमी उत्पन्न असलेल्या लोकांनाही चांगलं जीवन मान मिळू शकते कारण तिथे काही विशिष्ट सोयीसुविधांची उपलब्धता असते. तिथे काही स्कीम्स राबवल्या जातात. त्यामुळे बेकारीचा किंवा मंदीच्या कठीण काळातही लोकांना सरकारकडून मदत केली जाते. विकसित देशांमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे कमी कौशल्याच्या आणि कमी मोबदला असणाऱ्या कामांसाठी सुद्धा लोकांना झगडत बसावे लागत नाही. या सोयी सुविधा विकसनशील देशांमध्ये उपलब्ध नसतात.

आधुनिक जगाच्या बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची कास धरण्याशिवाय गत्यंतर नाही.आपल्या देशात विविध क्षेत्रात सुधारणा करून त्यात प्रगती करण्याची नितांत आवशकता आहे.आपला देश तर शेतीप्रधान देश आहे. शेतीमध्ये विकास झाला पाहिजे. यासाठी शेतीमध्ये संशोधन झाले पाहिजे, शेतीविषयक सेवा आणि तंत्रज्ञानाचा विकास झाला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात विकासाला चालना दिली पाहिजे. म्हणून ए.पी.जे. अब्दुल कलाम तरुणांना शेती,उद्योग,माहिती,दळणवळण,तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये खूप काम करण्याची,त्यामध्ये बदल घडवून आणण्याची संधी उपलब्ध करून देण्याविषयी आग्रही होते.

आपल्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी आपल्याला नावीन्यपूर्ण गोष्टी करायला हव्यात आणि स्वप्नातला भारत उभारण्यासाठी आपण आपला मार्ग निश्चित करायला हवा. देशाच्या नेतृत्वापुढे सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे जे लोक देशात परिवर्तन घडवून आणू शकतील अशा लोकांना एकत्र आणणे आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना कार्यरत करणं. आजच्या नेतृत्वा पुढे हेच महत्त्वाचे ध्येय आहे की आपल्या देशातील भ्रष्टाचार कमी करून नवनवीन कल्पना पुढे आणणे . म्हणूनच प्रत्येक भारतीय खास करून देशाची तरुण पिढी हा बदल नक्कीच घडवून आणू शकते.

Leave a Comment