शाहू महाराजांचा जन्म
आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात शाहू महाराजांचे नाव आदर्श राजा, बहुजन व दलित समाजाचे नेते, प्रजाहितदक्ष राजा अशा संबोधनांनी उल्लेखित केले जाते. लोकनेते राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाईसाहेब यांनी यशवंतराव यांना दत्तक घेतले. दत्तक घेतल्यानंतर यशवंतराव यांचे नाव शाहू छत्रपती असे ठेवण्यात आले, हेच राजर्षी शाहू महाराज होत. शाहू महाराज दत्तक म्हणून कोल्हापूर संस्थानात येण्यापूर्वीच त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला होता.
दत्तक घेतल्यानंतर इ.स.१८८५ मध्ये त्यांना राजकोट येथील राजकुमार काॅलेजात पाठविण्यात आले. कुस्ती, शिकार, घोड्यावर बसणे यांसारख्या कौशल्यांमध्ये त्यांची बरोबरी करणारा एकही राजकुमार तेथे नव्हता. त्याचठिकाणी त्यांचा मनमिळावू,निगर्वी व निर्भिड स्वभाव सर्वांच्या नजरेत भरला. इ.स.१८८५ ते १८८९पर्यंत महाराजांनी राजकोट येथील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १८९० ते १८९४ या काळात धारवाड येथे महाराजांचे शिक्षण झाले. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी २ एप्रिल १८९४ रोजी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी समाजजीवनाचे बारकाईने निरीक्षण केले. त्यावेळी त्यांना विविध अनुभव आले, त्यानुसार त्यांनी राज्यातील जनतेसाठी विविध योजना आखून जनतेच्या कल्यानाचे कार्य सुरू केले. ‘प्रजेच्या सुखातच राजाचे सुख आहे’ यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी संगीत, वाद्य, शिकार, कुस्ती, अश्वारोहण, मल्लखांब यांसारख्या कलांना प्रोत्साहन दिले. त्यांमुळे कोल्हापूर हे ख अर्थाने कलापूर झालेले दिसते. शाहू महाराजांनी संस्थानातील गुणी कारागिरांना उत्तेजन दिले.
शाहू महाराजांचे सामाजिक कार्य
समाजातील जातिभेद उच्चाटन
शाहू महाराजांनी शिक्षणाप्रमाणेच समाजातील जातिभेद नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी संस्थानातील सार्वजनिक पाणवठे आणि मंदिरे सर्वांसाठी खुली केली. गंगाराम कांबळे या महार व्यक्तीला कोल्हापूर शहरात भररस्त्यावर हाॅटेल घालून दिले. शाहू महाराज सर्व जातीतील लोकांबरोबर हॉटेलमध्ये चहा घेत असत. यावरून त्यांनी केलेल्या अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य लक्षात येते.
शेती आणि शेतकरी यांच्यासाठी उपाययोजना
महाराजांनी शेती आणि त्यावर अवलंबून असलेला शेतकरी यांच्यासाठीही अनेक उपाययोजना केल्या. त्यांनी केलेल्या शेतीच्या विकासाच्या प्रयत्नांमुळेच आजचा कोल्हापुर जिल्ह्यातील शेतकरी महाराष्ट्रात आदर्श ठरला. शेतीली पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी प्रथम प्राधान्य दिले. यासाठी भोगावती नदीवर धरणाची पायाभरणी केली.
उद्योगधंद्यांच्या निर्मितीस प्रोत्साहन
त्याचप्रमाणे शाहू महाराजांनी उद्योगधंद्यांच्या निर्मितीस प्रोत्साहन दिले. १८९५ मध्ये महाराजांनी‘शाहूपुरी’ या बाजारपेठेची स्थापना केली. मध्ये ‘शाहू छत्रपती स्पिनिंग आणि विव्हिंग मिल’ स्थापन केली.
शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य
सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा
शाहू महाराजांनी शिक्षण क्षेत्रात सुद्धा महत्वाच्या सुधारणा घडवून आणल्या. त्या काळात शिक्षणात ब्राम्हणांची मत्तेदारी होती. बहुजन समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन समाजाच्या तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी शाहू महाराजांनी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. १९१७ साली शिक्षण सर्वांसाठीच मोफत आणि सक्तीचे केले. संस्थानात विविध जातीधमांतील विद्यार्थ्यांसाठी बावीस वसतिगृहे उभारली. खेडोपाडी शाळा उभारल्या. विविध क्षेत्रांतील होतकरू, हुशार व्यक्तींना, कलाकारांना प्रोत्साहन, पाठबळ दिले. कोल्हापूर संस्थानाबाहेरील विविध शैक्षणिक संस्थांनाही पाठबळ देऊन ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. महाराजांनी इ. स. १९११ मध्ये प्रो. अण्णा बाबाजी लठ्ठे यांची एज्युकेशन इन्स्पेक्टर म्हणून नेमणूक केली. लठ्ठे हे हुशार व विश्वासू असल्यामुळेच महाराजांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली.
शिक्षकांसाठी प्रशिक्षणाची खास योजना
दर्जेदार शिक्षण द्यायचे झाल्यास शिक्षक वर्गही तितकाच गुणवान असावा, या हेतूने शिक्षकांसाठी प्रशिक्षणाची खास योजना महाराजांनी १९११ साली सुरू केली. ज्या शिक्षकांनी प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र मिळवले नाही व जे मराठी स्कूल फायनल परीक्षा किंवा विद्यापीठाची एखादी परीक्षा पास झाले नसतील, तसेच ज्यांचे वय ४० पेक्षा कमी असेल अशा शिक्षकांनी दोन वर्षांत व मुलकी परीक्षा पास होणे महाराजांनी बंधनकारक केले. जे शिक्षक पास होणार नाहीत, त्यांना बढती नाही, असा सक्त आदेश महाराजांनी दिला होता. त्याचबरोबर जे शिक्षक या परीक्षेला बसण्यास तयार होतील, अशा शिक्षकांना तीन महिन्यांची स्पेशल रजा मंजूर करण्यात येईल, असा आदेशही दिला होता. शाहू महाराजांचा हा विचार तत्कालीन परिस्थितीचा विचार करता किती महत्त्वाचा होता हे लक्षात येईल. शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांची परिस्थिती गरिबीची असल्यास व अशा विद्यार्थ्यांना शाळेची फी भरण्याचे सामर्थ्य नसल्यास त्यांना फी माफ करून शाळेत घेण्याच्या सक्त सूचनाही महाराजांनी दिल्या होत्या.
मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध योजना
मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण त्या काळात अत्यल्प होते. अशा वेळी मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी राजकन्या अक्कासाहेब महाराज व भावनगरच्या महाराणी नंदकुंवर यांच्या नावाने विशेष शिष्यवृत्ती जाहीर केल्या. मुलींच्या स्वतंत्र शाळा नसलेल्या ठिकाणी मुलांच्या शाळेत मुली पास झाल्यानंतर त्या शाळेतील शिक्षकांना बक्षिसे जाहीर करणारा हा एकमेव द्रष्टा राजा. जुने अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल (सध्याचे सीपीआर) या हॉस्पिटलमध्ये नर्सिंग अभ्यासक्रमाची सुरुवात करून तो पूर्ण करणाऱ्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. शैक्षणिक क्षेत्रातील धोरणात्मक बदलांना अनुसरूनच शाहू महाराजांनी १९१३ मध्ये कोडोली येथील शाळेतील मुख्याध्यापक गोविंद बळवंत कुंभोजकर यांच्यामार्फत ‘कोल्हापूर इलाख्यातील सर्व शाळांचे मास्तर यांचे वहिवाटीकरिता नियम’ असे एक परिपत्रक तयार करून घेतले. हे नियम सध्याचे तथाकथित शिक्षणसम्राट, शिक्षणमहर्षी यांच्या डोळ्यात अंजन घालणारेच आहेत. शिक्षकांनी कसे काम करावे, शाळेची व्यवस्था कशी असावी,शिक्षकांचे वर्तन कसे असावे, याबाबत विस्तृत नियमावली या परिपत्रकात दिसून येते.या नियमांत शिक्षकांना शाळा मास्तराचे काम करताना मुख्यत्यारी, वकिली, दुकानदारी व धंदा करण्यास मनाई आहे; परंतु पोस्टाचे वा म्युनिसिपालिटीचे काम करण्यास हरकत नाही, पण ही कामेही शाळेच्या वेळेत करण्यास मनाई होती.
शिक्षकांसाठी नियम
मास्तरांनी गावातील तंट्यात पडू नये, तंटे असतील तर कुणा एकाच्या बाजूने होऊ नये. सर्व खात्यातील लोकांशी मिळून मिसळून वागावे, असे महाराज सांगतात. मास्तरांनी अर्ज, खते, दस्तऐवजही लिहू नये. अगर त्यावर साक्ष घालू नये, असेही स्पष्टपणे नमूद केले आहे. शाळा व्यवस्थेबाबतच्या नियमात मास्तराने शाळेची इमारत व सभोवतीचा परिसर स्वच्छ व व्यवस्थित ठेवावा. शाळेचे सर्व सामान दुरुस्त राखणे, नादुरुस्त सामानाची वेळोवेळी दुरुस्ती करावी. पुस्तके, मासिके, पाक्षिके, कपाटात बंदिस्त करून न ठेवता योग्य, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना वाचण्यास उपलब्ध करून द्यावीत. शाळा साफ करण्याचे काम विद्यार्थ्यांकडून त्यांच्या इच्छेविरुध्द किंवा त्याच्या इच्छेनुसार योग्य मोबदला देऊन करून घ्यावीत. शाळेत मुलांनी वैयक्तिक स्वच्छता ठेवावी. मुलांना मारण्याचा प्रसंग जितका न होईल तितके बरे. जातीच्या कारणाने कोणत्याही मुलास शाळेत घेता येणार नाही, असे कोणाही विद्यार्थ्यास म्हणू नये.
फी माफी
मुलींकडून कोणत्याही प्रकारची फी घेऊ नये, ज्या मुलांची फी देण्यास असमर्थतता असेल त्याने मुलीकडून कोणत्याही फी घेऊ नये, ज्या मुलांची फी देण्यास त्याने शाळेकडील पंच कमेटीपैकी व्यक्तींचा की देण्यास असमर्थतेचा भारतराने चौकशी करून खात्री करून घ्यावी, विद्यार्थ्यास ठेवावे. नादार म्हणून विद्यार्थी घेताना शेतकरी मजूर लोक यांची प्रथम घ्यावीत, व्यापार करणाऱ्या पुढारलेल्या जातीची नंतर घ्यावीत; केव्हाही करणाऱ्या पुढारलेल्या नादाऱ्या नयेत. मागास जातीच्या मुलांकडून कोणत्याही प्रकारची फी घेऊ अशी नियमावली, शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी खासकरून महाराजांनी घेतली सर्व नियम या ठिकाणी देता येऊ नाहीत. पण, या नियमांचे अवलोकन केले असता प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचाही महाराज किती सूक्ष्म विचार करत, हे आपल्याला दिसून येईल.
पुढे १९१७ साली महाराजांनी सर्वांनाच शिक्षण मोफत परंतु, सक्तीचे करण्याचा कायदा केला. या कायद्याने शिक्षणक्षेत्रात फार मोठी क्रांती झाली. हा कायदा म्हणजे तत्कालीन काळाची गरज होती. शाहू महाराजांनी हा धोरणात्मक निर्णय घेतला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी खेडोपाडी शाळा सुरू केल्या. पण, एकाचवेळी इतक्या इमारती उभारणे शक्य नसल्याने गावातील मंदिरात, चावडीच्या इमारतीत शाळेची सोय करण्यात आली. शाळेत मुलांना न पाठवणाऱ्या पालकांना दंड करण्याची तरतूद करण्यात आली. बहुतांश पालक हा शेतकरीवर्गातील असल्याने त्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करवून घेतला. तत्कालीन ब्रिटिश इलाख्यात कोणत्याही राज्यकर्त्याने केले नसेल इतके बजेट म्हणजे सुमारे १ लाख रुपये शिक्षण खात्यासाठी महाराजांनी स्वतंत्र राखून ठेवले. या बजेटमधील रक्कम शिल्लक राहिल्यास ती इतरत्र न खर्च न करता फक्त शैक्षणिक बाबींसाठीच खर्च करावी, असा महाराजांचा स्पष्ट आदेश होता.
शंभर वर्षांपूर्वी शैक्षणिक क्षेत्रात महाराजांनी केलेले हे कार्य म्हणजे खरोखरच एक क्रांती होती. या कायद्याची अंमलबजावणी इ.स.१९१७ पासून सुरू केली. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती व शिष्यवृत्ती जाहीर केल्या. त्याचप्रमाणे महाराज स्त्रियांच्या शिक्षणासाठीही आग्रही होते. त्यांनी संस्थानात खास मुलींच्या स्वतंत्र शाळा स्थापन केल्या. दरबाराने हुशार मुलींसाठी शिष्यवृत्ती ठेवल्या होत्या. राजाराम काॅलेजातील सर्व मुलींना शिक्षण मोफत केले होते.
व्यावसायिक शिक्षणाकडेही महाराजांनी लक्ष दिले. खेडेगावचा कारभार व्यवस्थित चालविता यावा यासाठी त्यांनी पाटील व तलाठी शाळा चालू केल्या. शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र चालू केले. तांत्रिक शिक्षणासाठी जयसिंगराव घाटगे तांत्रिक संस्था स्थापन केली. या संस्थेत लोहारकाम, गवंडीकाम, सुतारकाम यासारख्या विषयांचे शिक्षण दिले जाई. लष्करी शिक्षणासाठी त्यांनी ‘इन्फंट्री स्कूल’ सुरू केले.
शाहू महाराजांनी सर्व स्तरातील जनतेच्या उद्धारासाठी कार्य केले. महात्मा जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे कार्य पुढे घेउन जाण्याचे कार्य शाहू महाराजांनी केले. महाराज फक्त बोलत नव्हते, तर ते कृतीशील समाज सुधारक होते.’बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या तुकाराम महाराजांच्या ओळी शाहू महाराजांना तंतोतंत लागू पडतात. त्यांच्या प्रती सामान्य जनतेत खूप जिव्हाळा होता. महाराजांचे कार्य शब्दांतून मांडणे शक्य नाही. एक आदर्श राजा, बहुजन आणि दलित समाजाचे नेते म्हणून असलेली त्यांची लोकप्रियता शेवटपर्यंत कायम टिकली. इ.स.१९२२ मध्ये महाराज आपल्या जनतेला कायमचे पोरके करून निघून गेले. पण त्यांच्या कार्यातून ते अजरामर झाले. त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते कोल्हापूर संस्थानापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात लोकप्रिय झाले.
वा..वा..वा….
👌