श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे !!
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे!!
आहा हा! या ओळी वाचताच अंगावर रोमांच उभे राहतात. मन प्रफुल्लित होते. मला ही कविता खूप आवडते. श्रावण मासातला पाऊस माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो. याच कवितेचे जणक, माझे सर्वात आवडते कवी आणि ते म्हणजे ‘बालकवी‘.बालकवींचे खरे नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे इ. स. १८९० मध्ये झाला. बालकवींचे वडील पोलीस खात्यात नोकरीस होते. त्यांना आपल्या नोकरीनिमित्त निरनिराळ्या गावी फिरावे लागत होते. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणाची काहीशी आबाळच झाली. एरंडोल, यावल, पुळे, जळगाव अशा गावी त्यांचे शिक्षण झाले. पुढे काही काळ त्यांनी ख्रिस्ती मिशनर्यांना मराठी शिकविण्याचे काम केले. त्यांनी काही दिवस अहमदनगर येथे प्रसिद्ध मराठी रेव्ह. ना. वा. टिळक व लक्ष्मीबाई टिळक यांच्याकडे वास्तव्य केले होते.
हे पण वाचा 👉 चांद्रयान-3, एक अवकाश सफर
मराठी निबंध : माझी शाळा मराठी निबंध
हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. बालकवींची पहिली कविता त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिली. त्यानंतरच्या तीन-चार वर्षात त्यांची कविता अधिक विकसित होत गेली. १९०७ साली जळगाव येथे भरलेल्या पहिल्या कवी संम्मेलनात त्यांनी आपल्या कवितेचे वाचन केले. तेव्हा ते १७ वर्षांचे होते. त्या सम्मेलनातच त्यांना डाॅ. कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांनी ‘बालकवी‘ ही उपाधी दिली. त्यानंतर त्यांचे बालकवी हेच नाव जनमानसात रूढ झाले.
त्यांच्या कविता या जनमानसात खूपच लोकप्रिय झाल्या. त्यांच्या २८ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी १६३ कविता लिहिल्या त्यांच्या निसर्गकविता लोकांना जास्त भावल्या. त्यांच्या कविता शालेय शिक्षणापासून महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या दिसतात. त्यांच्या कवितांवर पी.एच.डी. केली जाते. यावरूनच त्यांच्या कवितेची उंची समजते. त्यांच्या कवितेचं गारुड आजच्या पिढीवरही पहायला मिळते. अबाल वृद्धांना त्यांच्या कवितेंची गोडी लागलेली आपण पाहतो. यातच त्यांच्या कवितेचा मोठेपणा दिसतो.
बालकवींच्या ‘आनंदी आनंद गडे, औदुंबर, फुलराणी, श्रावणमास’ या कविता मला खूप आवडतात. त्यांच्या कवितेतील निसर्गाचे वर्णन मनाला आनंदीत करून जाते. त्यांच्या निसर्गकवितांचे मला खूप आकर्षण आहे. श्रावणातला पाऊस, इंद्रधनू, हिरवे हिरवे गालिचे साक्षात समोर दिसू लागतात. बालकवींच्या कवितेत दिसणारा आनंदी आनंद सर्वत्र दिसू लागतो. त्यामुळ जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. बालकवींच्या कविता वाचल्या की मनातला द्वेष, मत्सर, कंटाळा,उदासीनता कुठल्या कुठे पळून जाते.बातकवींच्या फुलराणी, संध्यारजनी, तारकांचे गाणे, अरुण, आनंदी-आनंद, श्रावणमास यांसारख्या कवितांनी मराठी काव्यरसिक संमोहित केले होते. यसभोवतालच्या सृष्टीचे त्यांनी अतिशय अचूक शब्दांत व लडिवाळ भाषेत आहे. फुलराणीचे वर्णन करताना ते म्हणतात –
“हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती”
एखादा निर्झर पाहिल्यावर त्यांच्या ओठावर शब्द येतात-
गिरिशिखरे वनमालाही दरी दरी घुमवित येई..
कड्यावरुनी घेऊन उड्या खेळ लतावलयी फुगड्या !!
घे लोळण खडकावरती फिर गरगर अंगाभवती..
जा हळू हळू वळसे घेत लपत लपत हिरवाळीत!!!
बालकवींनी निसर्गव्यतीरिक्त इतर विषयांतरही कविता लिहिल्या. पण त्यांना निसर्गाविषयी वाटणारे प्रेम आणि त्या प्रेमाचा त्यांनी आपल्या काव्यातून घडवलेला आविष्कार यामुळेच त्यांना ‘निसर्गकवी’ म्हटले जाते.त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या आयुष्यातील चढ-उतारांचा परिणामही त्यांच्या कवितेतून अधून-मधून दिसून येतो.
काही कविता त्यांच्या जीवनातील उदासीनतेवर आधारलेल्या आहेत. तरीही त्यातील काव्यरस कमी झालेला नाही. त्या कवितांमधूनही कवी मनाचा मागोवा घेत आपण त्यांच्या गाभ्या पर्यंत पोहोचतो. हाच त्यांच्या कवितेचा आत्मा आहे. बालकवींचा मृत्यू १९१८ साली जळगाव येथे झाला. त्यांना फक्त २८ वर्षांचे आयुष्य लाभले एवढ्या कमी आयुष्यात त्यांनी अशा अजरामर कविता लिहिल्या. बालकवींबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात त्यांनी आपल्या कवितेंच्या स्वरुपात आनंदी आनंद निर्माण केला.