एका शेतकऱ्याचे मनोगत
नमस्कार मित्रांनो, मी एक सामान्य शेतकरी बोलतोय. काय म्हणालात, कोणत्या प्रकारचा शेतकरी? अहो, शेतकऱ्याला का कोणती जात असते, कोणता प्रकार असतो? जगातले, भारतातले, महाराष्ट्रातले कुठलेही शेतकरी सारखेच. त्यांची शेती हीच त्यांची ओळख. त्याची जात, त्याची भाषा, त्याचा प्रांत, तो महाराष्ट्राचा की पंजाबचा? असं काहीच त्यांच्या साठी महत्वाचं नसतं. तो ‘शेतकरी’ याच बिरूदावलीनं जगत असतो. प्रत्येक शेतकरी त्यांच्या शेतीवर मुलाप्रमाणे माया करतो. या शेतकऱ्यावर माणव जातीचं अस्तित्व अवलंबून आहे. तरीही हा ‘शेतकरी’ दुर्लक्षितच आहे. देशात सरकार कुणाचही असलं तरी शेतकऱ्याचा विचार निवडणूकांपुरताच केला जातो.
तुम्हाला माहिती आहे, भारतात ब्रिटिशांचं आगमन होण्यापूर्वी शेतकरी खूप सुखी होता. बारा बलुतेदार, अठरा आलुतेदार आणि त्याना धान्य पुरवणारा शेतकरी यांच्यामुळं गावं स्वयंपूर्ण होती. ब्रिटिशांच्या आगमनानंतर त्यांच्या जुलमी शेतसारा पद्धतींमुळे शेतकरी पूर्ण उध्वस्त झाला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पंचवार्षिक योजनांमधून शेतीच्या विकासावर भर देण्यात आला. ८० च्या दशकात झालेल्या हरित क्रांतीमुळे देश अन्न धान्यात स्वयंपूर्ण झाला. माझ्या सारख्या जवळपास सर्व शेतकऱ्याचे जीवनमान सुधारले. त्यानंतर शेतीत सुधारणा होत गेल्या. शेती करण्यासाठी नव नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जावू लागला. शासन शेतीशी संबंधित नवनवीन धोरणं, नवीन कायदे करु लागले. या धोरणांचा परिणाम माझ्या सारख्या लहान शेतकऱ्यांच्या अधोगतीला कारणीभूत ठरू लागले. मोठे शेतकरी, बागायती शेती करणारे शेतकरी यांनाच त्या धोरणांचा फायदा होऊ लागला. माझ्या सारखे छोटे शेतकरी मात्र कर्जाच्या बोज्याखाली दिवसेंदिवस जास्तच गुरफटत गेले. शेती कसण्यासाठी लागणारे साहित्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. सध्या शेतीसाठी बैल उपलब्ध नसल्यामुळे यंत्राच्या सहाय्याने कामं करवून घेतली जातात. यामुळे खर्च वाढतो. खतं, बियाणं, कीटकनाशकं यांच्या वाढत्या किमती शेतकऱ्याला सावकारी पाशात ओढत चालल्यात. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्ना पेक्षा त्यावर होणारा खर्च शेतकऱ्यांना कर्जबाजारी बणवत आहे. शासकीय धोरणं या सर्वाला हातभार लावत आहेत. बॅकांचे हप्ते, भरण्यासाठी शेतकऱ्याला सावकारांकडे जमिनी गहाण ठेवाव्या लागत आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढत चालले. टी.व्ही. मोबाईल,फ्रिज, गाड्या, बंगले यांच्या किंमती वाढत चालल्यात. पेट्रोलने शंभरी ओलांडली. तरीही चर्चा करण्यापलीकडे कुणी काही बोलत नाही. पण भाज्या, अन्न-धान्य यांचा भाव जरा वाढला तर लगेच समाजात, सोशल मिडियावर सर्वत्र महागाई वाढली म्हणून ओरड चालू होते, आंदोलनं चालू होतात. आम्हाला आपला माल कवडीमोल किंमतीनं विकावा लागतो. मधले दलाल सगळा नफा आपल्या खिशात घालतात. आम्ही दाद मागायची कुणाकडं. आम्हाला कुणी वालीच राहिला नाही. कधी दुष्काळ तर कधी महापूर आमच्या पाचवीलाच पुजलेला. ही सामाजिक व्यवस्थाच माझ्यासारख्या शेतकऱ्याला आत्महत्येला प्रवृत्त करत आहे.
सध्याची कोरोनाची परिस्थिती तर या सर्वांपेक्षा भयानक. लाॅकडाऊनमुळं शेतातला माल जाग्यावरच ठप्प राहिला. कष्टानं उभं केलेलं पीक शेतातच कुजवून टाकावं लागलं. कोणतीही आपत्ती आली तरी त्याचा पहिला परिणाम शेतकऱ्यावरच होतो. तरीही माझ्यासारखा शेतकरी सर्व विश्वाचा भार घेऊन उभा आहेच.