आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना आपल्याला भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या क्रांतिकारकांच्या कार्याचे आपल्या नवीन पिढीला ज्ञान होणे गरजेचे आहे. त्यासाठी क्रांतिकारकांचे कार्य थोडक्यात आपण बघू.
क्रांतिकारी चळवळ –
१५ ऑगस्ट १९४७ ला आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. कोट्यवधी भारतीयांनी ज्याचे स्वप्न पाहिले, कितीतरी महान क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, तुरुंगवास भोगला तो आपल्या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी. ती सोनेरी पहाट १९४७ च्या सूर्यकिरणांनी न्हाऊन निघत उगवली. “उगवली ती पहाट, उगवली ती पहाट, जिची सूर्यकिरणे सुद्धा पाहत होती वाट”. अशी ही पहाट प्रत्येक भारतीयाच्या मनात कितीतरी सोनेरी स्वप्न घेऊन उगवली. ती स्वप्न खांद्यावर घेऊन स्वतंत्र भारताची वाटचाल चालू झाली. आज आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करण्यासाठी सज्ज झालो आहोत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना आपल्याला या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांना, स्वातंत्र्य सैनिकांना विसरून चालनार नाही. यासाठी आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आजच्या पिढीसमोर ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये १८८५ मध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय काँग्रेस ही महत्त्वाची घटना होती. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमुळे ब्रिटीश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संघटितपणे संघर्षाची एक चळवळ उभी राहिली.
प्रारंभीच्या काळात कॉंग्रेसचे कार्य नेमस्त किंवा मवाळ पद्धतीचे होते. ब्रिटीशांशी संघर्ष न करता अर्ज-विनंत्यांच्या माध्यमातून, कायद्याच्या चौकटीत सनदशीर मार्गाने प्रक्षोभ करने अशी प्रारंभिक राष्ट्रवादी नेत्यांची कार्यपद्धती होती. मवाळ राष्ट्रवादी नेत्यांना माहित होते की, भारत हा नुकताच राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेत शिरला आहे त्यामुळे भारतीय राष्ट्रवादास काळजीपूर्वक प्रोत्साहित केले पाहिजे. त्यामुळे त्यांनी आपल्या राजकीय व आर्थिक मागण्या अशा रीतीने तयार केल्या की, संपूर्ण देशाचा एक सामाईक, आर्थिक व राजकीय कार्यक्रम तयार होईल व संपूर्ण भारतीय जनतेला एकसंघ करता येईल.
या सर्वांमुळे लोकांची विचारसरणी बदलून देशात नवचैतन्य निर्माण झाले होते. पण मवाळांच्या सनदशीर मार्गाचा ब्रिटिश राज्यकर्त्यांवर काही परिणाम होत नसल्याने केवळ ब्रिटिशांच्या सदिच्छेवर विसंबून राहून स्वराज्य मिळणार नाही. त्यासाठी प्रतिकार करावा लागेल, राष्ट्रीय चळवळ तीव्र करावी लागेल, लोकमताच्या दडपणाखाली नमण्यास सरकारला भाग पाडावे लागेल अशी मागणी करणारा गट भारतात निर्माण झाला त्याला ‘जहाल’ असे म्हणतात. ‘स्वदेशी’ व ,स्वराज्य, ही जहालांची ध्येय होती, तर ‘बहिष्कार’ व ‘अक्रिय संघर्ष’ या कार्यपद्धती होत्या. मात्र क्रांतिकारकांना जहालवाद्यांपेक्षाही अधिक वेगाने परिणाम हवा होता. त्यांना मवाळांची सनदशीर पद्धत व जहालांचा कमी दर्जाचा दबाव मान्य नव्हता. यासाठी त्यांनी हिंसेचा मार्ग अनुसरला.
वासुदेव बळवंत फडके –
ब्रिटिशांच्या आर्थिक पिळवणूकी विरोधात बंड पुकारणारे वासुदेव बळवंत फडके यांना ‘सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक‘ म्हणतात. भारतातील दुष्काळ, उपासमार, दारिद्र्य यास केवळ ब्रिटिश जबाबदार आहेत, त्यांना भारतातून घालवण्सायासाठी १८५७ च्या उठावाप्रमाणे उठावाची गरज आहे, असे त्यांचे मत होते. समाजात ऐक्याची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी पुण्यात ‘ऐक्यवर्धिनी संस्था,’ पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूट ही शाळा, स्वदेशी पुरस्कार, नेमबाजीचा गुप्त वर्ग इत्यादी कामे केली. उठावासाठी त्यांनीं धनगर, रामोशी यांना एकत्र केले. रेल्वे, तुरुंग, टपाल कार्यालये यांच्यावर हल्ले केले.
दत्त महात्म्य हा ७००० ओव्यांचा ग्रंथ लिहिला. आपली उद्दिष्टे दर्शवणारा जाहीरनामा त्यांनी दोनदा जाहीर केला. २३ जुलै १८७९ रोजी त्यांना विजापूर जवळ एका बौद्ध विहारात झोपेत असताना अटक करण्यात आली. एडनच्या तुरुंगात ब्रिटिशांच्या अनन्वित छळामुळे १७ फेब्रुवारी १८८३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
चापेकर बंधू –
१८९६-९७ मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. वाॅल्टर चार्लस रॅंड याला साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कमिशनर म्हणून नेमण्यात आले होते. त्यावेळी पुण्यातील घरांची तपासणी करताना घरात बूट घालून हिंदू देवदेवतांची, स्त्रियांची विटंबना करणाऱ्या सैनिकांना रॅंडने जराही आवरले नाही. उलट त्यांचे समर्थनच केले. याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण चापेकर यांनी २२ जून १८९७ रोजी रॅंडला गणेश खिंड येथे ठार केले. १८९८ मध्ये दामोदर चापेकर यांना पकडण्यात आले.
एप्रिल १८९८ मध्ये त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. बाळकृष्ण चापेकर यांना जानेवारी १८९९ मध्ये पकडण्यात आले. पोलिसांना माहिती देणाऱ्या डेव्हिड बंधूंची वासुदेव चाफेकर, महादेव विनायक रानडे, खंडू साठे यांनी ठार केले. त्या सर्वांना मे १८९९ मध्ये फाशी देण्यात आली. लाला लाजपत राय यांनी चाफेकर बंधूंना ‘भारतातील क्रांतिकारी चळवळीचे आद्य संस्थापक’ म्हणून गौरव केला.
विनायक दामोदर सावरकर –
विनायक दामोदर सावरकरांचा जन्म 28 मे १८८३ रोजी नाशिक येथील भगूर या ठिकाणी झाला. अवघे सतरा वर्षांचे असताना त्यांनी १९०० मध्ये मित्रमेळा या गुप्त क्रांतिकारी संघटनांची स्थापना केली. तीचे नंतर १९०४ मध्ये अभिनव भारत असे नामकरण केले. नोव्हेंबर १९०५ मध्ये सावरकरांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी घडवून आणली. डिसेंबर १९०५ मध्ये बी.ए. झाल्यानंतर सावरकर फेलोशिपवर पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले. लंडनला येण्यामागे त्यांचे मुख्य उद्देश म्हणजे ब्रिटीशांच्या प्रबळ व दुर्बल बाजूंचा अभ्यास, भारतातून आलेल्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्यात स्वातंत्र्याची भावना प्रज्वलित करणे, इतर देशांच्या क्रांतिकारकांशी संबंध इत्यादी होते.
सावरकरांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडिया हाऊस येथे ‘फ्री इंडिया सोसायटी’ स्थापना करून स्वातंत्र्य हेच लक्ष्य असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना संघटित केले. १० मे १९०७ रोजी सावरकरांनी १८५७ च्या उठावाची 50 वी जयंती साजरी केली. १९०८ मध्ये सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे १८५७ च्या उठावाची कारणे व परिणाम यांचे विवेचन करणारे पुस्तक मराठीत लिहून पूर्ण केले. इंडिया हाऊस मधील त्यांच्या मित्रांनी ते इंग्रजीत भाषांतरित केले. ब्रिटिश सरकारने त्याच्या प्रकाशनावर बंदी घातली होती. सावरकर लंडनला गेल्यामुळे अभिनव भारतचे काम गणेश सावरकर हे त्यांचे बंधू पाहत होते. सावरकर त्यांना लंडनमधून शस्त्रे, क्रांतिकारी साहित्य पाठवत असत. १९०९ मध्ये गणेश म्हणजेच बाबाराव सावरकरांना अटक करून जन्मठेपे साठी अंदमानला पाठवण्यात आले.
१ जुलै १९०९ रोजी मदनलाल धिंग्रा ह्यांनी सर कर्झन वायली याला गोळ्या घालून ठार केले. १७ ऑगस्ट १९०९ रोजी त्यांना फाशी देण्यात आले. २१ डिसेंबर १९०९ रोजी अभिनव भारतच्या अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला गोळ्या घालून ठार केले. नाशिक खटल्यात कान्हेरे, देशपांडे व कर्वे यांना फाशी देण्यात आले. १३ मार्च १९१० रोजी सावरकरांना लंडन स्टेशन वर अटक करण्यात आली. एस. एस. मोरया या स्टीमर मधून त्यांना भारतात आणले जात असताना ९ जुलै १९१० रोजी फ्रान्सच्या मार्सेलिना बंदरात येतात समुद्रात उडी मारून निसटण्याचा प्रयत्न केला. पण किनाऱ्यावर त्यांना पोलिसांनी पुन्हा अटक केली. जुलै १९१० मध्ये सावरकरांना भारतात आणण्यात आले. त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा (50 वर्षं) सुनावण्यात आली. त्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये पाठवण्यात आले.
महाराष्ट्रातील क्रांतिकारकांप्रमाणेच बंगाल प्रांतातील क्रांतिकारी कार्य ही महत्त्वाचे आहे.बारींद्र कुमार घोष व भूपेंद्रनाथ दत्त यांनी युगांतर या वृत्तपत्राद्वारे बंगालमध्ये देशभक्ती जागृत करण्याचे कार्य केले. लाॅर्ड कर्जन ने बंगालची फाळणी केल्यामुळे बंगालमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. हेमचंद्र दास व उल्लास दत्त यांनी बॉम्ब बनवण्याची कला शिकून घेतली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली कलकत्त्या जवळ माणिकताळा येथे बॉम्ब बनवण्याचे कार्य सुरू झाले.सर जॉन बाम्फिल्ड फुलर याच्यावर या बॉम्बचा पहिला वापर बारींद्रकुमार घोष व भूपेंद्रनाथ दत्त यांनी १९०७ मध्ये केला. मात्र फुलर बचावला. खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी ३० एप्रिल १९०८ रोजी मुजफ्फरपुरचा जज्ज किंग्जफोर्डला ठार करण्याचा प्रयत्न केला. पण त्या हल्ल्यात तो थोडक्यात बचावला आणि चुकून दोन ब्रिटिश महिला ठार झाल्या. प्रफुल्ल चाकी ने (वय 19 वर्षे)स्वतःवर गोळी झाडून घेतली. खुदिराम बोसला (वय वर्ष १८) ११ ऑगस्ट १९०८ रोजी फाशी देण्यात आली.
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आजाद –
३० ऑक्टोबर १९२८ रोजी सायमन कमिशन लाहोर भेटीवर आले असताना कमिशन विरोधात लाला लजपत राय यांनी शांततापूर्ण मोर्च्या काढला. पण जेम्स ए. स्कॉट या पोलिस अधीक्षकाने पोलिसांना मोर्चावर लाठी हल्ला करण्याचा आदेश दिला. त्यात झालेल्या दुखापतीमुळे लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. भगतसिंगने स्कॉट चा खून करून लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याचे ठरवले. १७ डिसेंबर १९२८ रोजी स्कॉट साँडर्स समजून राजगुरू, भगतसिंग यांची गोळ्या घालून ठार केले. ८ एप्रिल १९२९ रोजी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय कायदे मंडळात दोन बॉम्ब फेकले.
पण त्यांचा उद्देश लोकांना मारणे हा नव्हता. ते बॉम्बे निरुपद्रवी करण्यात आलेले होते. आपल्या उद्दिष्टांची व कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी हा उद्देश बॉम्ब फेकण्या मागे होता. भगतसिंग व बटुकेश्वर यांनी स्वतःला अटक करवून घेतली. त्यानंतर सुखदेव, किशोरीलाल व जय गोपाल यांना अटक करण्यात आली. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासह २७ कैद्यांवर लाहोर कट खटला या नावाने खटला सुरू झाला. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना २३ मार्च १९३१ रोजी लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली. २७ फेब्रुवारी १९३१ रोजी चंद्रशेखर चंद्रशेखर आजाद त्यांनी पोलिसांशी झालेल्या चकमकीत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. यशपाल, भगवतीचरण व्होरा, कैलास पती, नरेंद्रनाथ भट्टाचार्य, रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्ला खान, ठाकूर रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी, सचिंद्रनाथ संन्याल, सचिंद्र बक्षी अशी कितीतरी ज्ञात-अज्ञात नावे या क्रांतिकार्यात फासावर गेली. काहींना जन्मठेप झाली. पण त्यांच्या कार्यामुळे ब्रिटिश
सत्ता खडबडून जागी झाली. कल्पना दत्त, प्रीतीलता वड्डेदार, शांती घोष, सुनीती चौधरी यांसारख्या तरुण क्रांतिकारी स्त्रियांनीही स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. भारत मातेला परकीय सत्तेच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी या सर्वांनी जे बलिदान दिले ते कधीही विसरता येणार नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना आपण या सर्वांच्या कार्याची ओळख या पिढीला करून देणे गरजेचे आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधीजी, सुभाष चंद्र बोस, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशी कितीतरी महान व्यक्तिमत्त्व या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी काही जहाल तर काही अहिंसेच्या वाटेने तर काही धडाडीने लढली.
त्यांची कार्ये शब्दातीत आहेत. भारतीय स्वातंत्र्यासाठी हजारो व्यक्तींचे प्रयत्न कारणीभूत आहेत. त्यांच्या प्रयत्नातूनच १८ जुलै १९४७ रोजी ‘भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947′ म्हणून ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पारित करण्यात आला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत आणि पाकिस्तान दोन देश अस्तित्वात आले. भारतीय जनतेसाठी हा दिवस आनंदाचा दिवस होता. प्रचंड संघर्षानंतर व प्रचंड दुःख, त्याग सहन करून स्वातंत्र्य मिळवले होते. आता १५ ऑगस्ट २०२१ ला आपण या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी म्हणजेच ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहोत.
या 75 वर्षात आपण काय साध्य केलं आणि काय गमावलं याचा पण थोडक्यात विचार करावा लागेल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि नियोजनाच्या मार्गाने आर्थिक विकास साध्य करण्याचा मार्ग अनुसरला. पण १९९१ च्या आर्थिक सुधारणांपासून भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास नियोजित मिश्र अर्थव्यवस्थे कडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे सुरू आहे. आपली अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था आहे. अजूनही भारताचा दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर, वृद्धी दरातील चढ-उतार, लोकसंख्येचा उच्च वाढीचा दर, दारिद्र्याचे उच्च प्रमाण, बेरोजगारीचा उच्च दर, कृषी आधारित अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत.
१ एप्रिल १९५१ पासून भारतात नियोजनाला सुरुवात झाली. नियोजन आयोगाने पहिल्या पंचवार्षिक योजनेपासूनच कृषी क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर उद्योग, शिक्षण, दारिद्र्य निर्मूलन यावर भर, स्वावलंबन, रोजगार निर्मिती, अन्नधान्यात स्वयंपूर्णता, मानवी विकास, ग्रामीण विकास, शाश्वत विकास, स्त्रियांचे सबलीकरण, साक्षरतेत वाढ यावर नियोजनात भर देण्यात आला.
१९९१ मध्ये देशापुढे आर्थिक संकट उभारले होते. व त्यातून मार्ग काढण्यासाठी आर्थिक सुधारणा करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची राजकीय इच्छाशक्ती असलेले सरकार त्या वेळी होते. त्यावेळचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी सुधारित ‘आर्थिक उदारीकरण धोरण १९९१’ मांडले. या धोरणाने देशात आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले. यानंतरच्या काळात या धोरणाची फळे निश्चितच मिळाली. बंदिस्त अर्थव्यवस्था मुक्त व्हायला लागली. एकूण अर्थव्यवहारावरील सरकारी वाटा कमी करून काही गोष्टी मुक्त बाजारावर सोडणं हे या धोरणाच वैशिष्ट्य होतं.
शालेय स्तरावर आपण अभ्यासलेल्या इतिहासामध्ये क्रांतिकारक क्रांतिकारकांविषयी त्रोटक माहिती दिली आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारकांविषयी सविस्तर विवेचन करून त्यांच्या कार्याचे योगदान चांगल्या रीतीने स्पष्ट केली आहे.
Nice article! Writer explained from the inception how the freedom movement started. Besides, it also explained how economic development started by two Veteran politician late Mr. Narsinghrao and Dr. Manmohan Sing.
खूप छान माहितीपूर्ण लेख.. वाचून आनंद झाला
खुपच छान माहिती आहे. खरच मलाही असे वाटते की आजच्या विद्यार्थीना आपल्याला स्वातंत्र मिळवून देणारया वीर क्रांतीकारकाच्या बद्दल कोणीतरी माहिती देणे गरजेचे आहे.त्याशिवाय मुलांच्या मनात त्यांच्या विषयी आदर निर्माण होणार नाही मॅडमनी खुपच छान मुलांना सहज समजेल अशा शब्दात विषयाची मांडणी केली आहे.
धन्यवाद मॅडम
Thank you sir
Thank you sir
Thank you sir
Nice article mam, In history we studied such a marvelous work done by these respectable freedom fighters. On the occasion of independence day this article inspires us.
Thank you sir