शिक्षणातील बदलते प्रवाह आणि भविष्यकालीन आव्हाने | shikshanatil navin vichar pravah

     आपल्याला सद्यस्थित शिक्षणातील बदलते प्रवाह आणि आव्हाने बघत असताना त्यापूर्वी आपल्या देशातील प्राचीन शिक्षण प्रणाली आणि तिचा इतिहास थोडक्यात बघावा लागेल. 

प्राचीन शिक्षण प्रणाली   

आपली भारतीय संस्कृती जशी प्राचीन आहे तशीच आपली शिक्षण प्रणाली सुद्धा प्राचीन कालखंडा पासून प्रचलित आहे. या  काळात गुरुकुल शिक्षण पद्धती होती. इ.स.पूर्व  १२००  पर्यंतचा कालखंड हा साधारण या शिक्षण प्रणालीचा होता.या  कालखंडालाच ऋग्वेदकाल असेही म्हणतात. या कालखंडात शिक्षण सर्वांसाठी मुक्त म्हणजेच खुले होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चारही वर्णातील व्यक्तींना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार होता. ऋग्वेदकालीन शिक्षण प्रणालीत शिक्षणाची ध्येये अत्यंत व्यापक होती. 

तत्कालीन शिक्षण केवळ पोटार्थी नव्हते. तसेच ते निव्वळ पुस्तकी नव्हते. व्यक्तीला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणे हे शिक्षणाचे ध्येय होते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे, सत्य, सेवा, नम्रता, शिस्त, संयम, कष्टाची सवय, धर्मपालन वृत्ती इत्यादी गुणांचे संवर्धन करून विद्यार्थ्यांचा मानसिक व शारीरिक विकास साधणे हे शिक्षणाचे ध्येय मानले जाई. गुरुचे गुरुकुलातच  वास्तव्य असे. गुरु हा ज्ञानी, चारित्र्यसंपन्न, निपक्षपाती असावा अशी अपेक्षा असे. शिष्याची ओळख त्याच्या गुरु वरून होई. शिष्याच्या चांगल्या-वाईट वर्तनाची जबाबदारी गुरुवरच टाकली जाई.

उत्तर वैदिक काळातील शिक्षण  

हा कालखंड सुमारे इ.स. पूर्व  १२००  ते इ.स.पूर्व  ६००  पर्यंतचा मानला जातो. या काळात धार्मिक, राजकीय व सामाजिक जीवनात मोठे बदल घडून आले. या काळात ब्राह्मणांचे महत्त्व वाढले. यज्ञ, धार्मिक विधींचे महत्त्व वाढले. वर्णव्यवस्था ठार झाली. स्त्रियांचे स्थान व दर्जा घसरला. शिक्षण पद्धतीतही महत्त्वाचे बदल घडून आले.

या काळात शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला.  स्त्रियांच्या शिक्षणावरही अनेक निर्बंध घालण्यात आले. त्यानंतर गुरुकुल पद्धती जाऊन ‘आश्रम पद्धती’ विकसित झाली. आश्रमात वेदशास्त्रा बरोबरच नीतिशास्त्र, इतिहास, युद्धशास्त्र असे विविध विषय शिकवले जात. आश्रमातील विद्यार्थी आपल्या वर्णाला अनुसरून शिक्षण घेत. या काळात स्त्री शिक्षणाचा मात्र  उत्तरोत्तर संकोच होत गेला. राजघराण्यातील स्त्रिया शिक्षण घेत. सामान्य स्त्रिया मात्र शिक्षणापासून वंचित राहिलेल्या दिसतात. 

बौद्धकालीन शिक्षण प्रणाली

प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीच्या  विकासातील या कालखंडाला बौद्धकालीन शिक्षण पद्धतीचा कालखंड म्हणतात. हा साधारणतः गौतम बुद्धांच्या बौद्ध धर्माच्या स्थापनेपासून ते सम्राट हर्षवर्धनाच्या राजवटीपर्यंत मानला जातो. हा कालखंड प्राचीन भारतीय शिक्षणात महत्त्वाचा मानला जातो. या काळात प्राथमिक शिक्षण बुद्ध  मठात दिले जाई.

उच्च शिक्षणासाठी या कालखंडात तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला इत्यादी मोठमोठी विद्यापीठे स्थापन झाली. विद्यापीठांची स्थापना ही प्राचीन भारतीय शिक्षणाच्या  विकासातील सर्वात प्रगत टप्पा मानला जातो. या विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘द्वारपरीक्षा’ नावाची अत्यंत कठीण परीक्षा द्यावी लागत असे. बौद्ध संघातून सर्वांच्या संमतीने निवडलेल्या विद्वान व चारित्र्यसंपन्न अशा भिक्षु कडे विद्यापिठाची प्रशासकीय सूत्रे दिली जात. बौद्ध विद्यापीठांतून बौद्ध धर्माची शिकवण, तत्वज्ञान, भाषाशास्त्र, शिल्पकला, संगीत, खगोलशास्त्र, व्याकरण तसेच इतर धर्मांची शिकवण इत्यादी विषय शिकवले जात.

हिंदू विद्यापीठांत वेदविद्या, खगोल, संस्कृत, व्याकरण, धर्मशास्त्र, कला यांचे शिक्षण दिले जाई. या विषयांव्यतिरिक्त हस्तकला, वास्तुकला, शिल्पकला, विज्ञान-तंत्रज्ञान, औषधोपचार, शल्यचिकित्सा यांचेही शिक्षण दिले जाई. या विद्यापीठातून देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षण  घेण्यासाठी येत असत. या काळातील काही प्रवाशांच्या प्रवासवर्णनावरून असा संदर्भ मिळतो की  या विद्यापीठांत जवळपास ४०००  ते  ५०००  विद्यार्थी शिक्षण घेत असत.

 मध्ययुगीन कालखंड

साधारण  इ.स. १२०० ते इंग्रज भारतात येण्यापूर्वीचा कालखंड हा मध्ययुगीन कालखंड मानला जातो. या काळात शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात आकुंचन झालेले  दिसते. ब्राह्मणांच्या वर्चस्वामुळे सर्वसामान्यांना अज्ञानाच्या अंधारात खितपत पडावे लागले. मंत्र-तंत्र व जादूटोणा यांचे प्रस्थ वाढले. अनिष्ट चालीरीती, प्रथा, परंपरा व कट्टरकट्टर धार्मिक विधी, होम हवन यांचे प्रमाण वाढले. स्त्रियांच्या वरची बंधने जास्तच घट्ट झाली. त्यांना शिक्षणाची द्वारे पूर्णपणे बंद केली गेली. सर्वसामान्यांचे जीवन अज्ञानामुळे अघोरी प्रथांच्या आहारी गेले. हा कालखंड ‘अंधकारमय कालखंड’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

या काळात महाराष्ट्रात विविध थोर संत होऊन गेले. त्यांनी अज्ञानात खितपत पडलेल्या समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. त्यांनी सर्वसामान्य जनतेला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे कार्य केले. त्यांच्यात एकजूट निर्माण केली. आणि प्रथा परंपरांच्या जोखडातून त्यांना मुक्त करण्याचे कार्य केले. विखुरलेल्या समाजाला संघटित करण्याचे कार्य केले. त्यांच्या या कार्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार झाले. 

ब्रिटीशकालीन शिक्षण प्रणाली-    

     सतराव्या शतकानंतर पोर्तुगीज, डच, फ्रेंच राजसत्तांनी भारतात प्रवेश केला. याच राजसत्तांनी भारतात प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. त्यांच्या नंतर इंग्रज भारतात आले आणि त्यांनी  व्यापार करत पूर्ण भारत देश स्वतःच्या अंमलाखाली आणला. त्यांनी भारतीयांना पाश्चिमात्य धरतीचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांचे शिक्षण सर्वांसाठी खुले होते. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार होण्यास मदत झाली.

पाश्चिमात्य शिक्षणातून स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची ओळख भारतीयांना झाली. धार्मिक शिक्षण मागे पडून धर्मनिरपेक्ष शिक्षणाचा विकास झाला. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांनी समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करून समाजात  जागृती निर्माण करून समाज सुधारण्याचे कार्य केले. यातून नंतर राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होण्यास मदत झाली आणि स्वातंत्र्य चळवळ हळूहळू मूळ धरू लागली. इंग्रजांनी त्यांना कारकुनी कामात मदत होईल अशा कारकून निर्माण करणाऱ्या शिक्षणावर भर दिला.

स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण –

1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपली साक्षरतेची गरज सर्वांनाच प्रकर्षाने जाणवली. राज्यघटनेने ६ ते १४ वयोगटातील  मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद राज्यघटनेत केली. योजना आयोगाने पण आपल्या पंचवार्षिक योजनांमध्ये शिक्षणाला अग्रक्रम दिलेला दिसतो. स्वातंत्र्यानंतर भारत  सरकारने विविध शैक्षणिक आयोग भारतीय शिक्षणाच्या सुधारणेसाठी नेमले. त्यामध्ये  १९४८  चा राधाकृष्ण आयोग उच्च शिक्षणात सुधारणा  घडवून आणण्यासाठी नेमला. 

त्यानंतर १९६४  ला डॉ. डी.एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व उच्च शिक्षणातील दर्जा सुधारण्यासाठी कोठारी आयोग नेमला. या आयोगाने महत्त्वाच्या सुधारणा करण्याच्या सूचना अहवालात नमूद केल्या. त्यांनी १ ते ३ वर्षांचे पूर्वप्राथमिक, १० वर्षांचे माध्यमिक, त्यानंतर २  वर्षांचे उच्च माध्यमिक, ३  वर्षांचे पदवी व २ किंवा ३  वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण असा शिक्षणाचा आकृतिबंध तयार केला. या आयोगाने एकूणच सर्व स्तरावरील शिक्षणाचा सखोल अभ्यास करून महत्त्वाच्या सूचना मांडल्या. भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर १९६८ चे  पहिले शैक्षणिक धोरण जाहीर केले. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण :  १९६८ –

 कोठारी आयोगाच्या  शिफारशींवर आधारित भारत सरकारने  आपले पहिले शैक्षणिक धोरण १९६८ मध्ये प्रसिद्ध केले. शिक्षणाचा नवीन आकृतिबंध व उच्च माध्यमिक शिक्षणाचे व्यवसायीकरण, कार्यानुभव, समाजसेवा, पुस्तक निर्मिती, शिक्षकांचे सुधारित वेतन मान, कृषी विद्यापीठ स्थापना, त्रिभाषा सूत्र, दुर्बलांचे शिक्षण, स्त्री शिक्षण, विद्यापीठांची स्थापना  इत्यादी शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली.   त्यामुळे भारतीय शिक्षणाच्या  विकासाला वेगळी दिशा प्राप्त झाली. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : १९८६ – 

राजीव गांधी सरकारने हे धोरण जाहीर केले. या धोरणातील  महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे 

  1. सर्वांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे. 
  2. समता प्रस्थापित करण्यासाठी शिक्षण देणे. 
  3. प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणाची पुनर्रचना रचना करणे. 
  4. शिक्षकांच्या प्रशिक्षणात आधुनिकता आणणे.
  5.  राष्ट्रीय उत्पन्नाच्या  १० टक्के इतकी गुंतवणूक शिक्षणात करणे. 
  6. प्रशिक्षण व निरंतर शिक्षणावर भर देणे.
  7.  शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय साधन संपत्तीचा योग्य विकास व वापर करणे. 
  8. शिक्षण पद्धती समाजाभिमुख बनविणे.
  9.  अभ्यासक्रमात “स्वातंत्र्यलढा, संविधानिक जबाबदाऱ्या, राष्ट्रीय अस्मिता, सामाजिक-सांस्कृतिक वारसा, समतावाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समस्यांचे  निर्मूलन, लहान कुटुंबांचा आदर्श, वैज्ञानिक मनोवृत्तीची रुजवणूक” या दहा गाभाभूत  घटकांचा समावेश करणे.
  10.  तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची पुनर्रचना करणे.
  11.  बाल संगोपन व शिक्षण यांचा समन्वय साधणे. मुक्त विद्यापीठे, दूर शिक्षण विभाग, ग्रामीण विद्यापीठे स्थापन करणे ,बुद्धिमान  विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालय स्थापने, पदवी व नोकरी यांची यांची फारकत करणे इत्यादी. १९६८ चे  शैक्षणिक धोरण यशस्वी होउ शकले नाही. याची दखल १९८६ च्या धोरणात घेतली गेली. 

सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण :१९९२ – 

१९८६  च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी व परिणाम यांचे पुनर्विलोकन करुन हे सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९९२ मध्ये जाहीर केले. त्यामध्ये पुढील शिफारशी केल्या. 

  1. शैक्षणिक प्रशासन व नियोजन यामध्ये शिक्षण तज्ञांना सहभागी करून घेणे.
  2.  शैक्षणिक प्रशासन व पर्यवेक्षणात  सेवांतर्गत सेवकांना सहभागी करून घेणे.
  3. राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय ‘शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद’ ( NCERT)  ‘राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था’ (NIEPA), ‘विद्यापीठ अनुदान आयोग’  (UGC) या तीन संस्थांचे पुनर्विलोकन करणे. 
  4. चर्चासत्रे, कार्यशाळा, नवीन अभ्यासक्रम इत्यादी वरील खर्च भ्रामक असून  तो शालेय साधन सुविधांसाठी करावा. 
  5. उच्च शिक्षणावर केला जाणारा अमाप खर्च कमी करून तो सामान्य शिक्षणाकडे वळवावा
  6.  शैक्षणिक धोरण ठरवल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या वित्ताची व्यवस्था करावी.                                                         सुधारित शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी एक कृती कार्यक्रम निश्चित केला. त्यामध्ये शैक्षणिक प्रशासनात सुधारणा करणे, सक्तीचे प्राथमिक शिक्षण यशस्वी करणे, शिक्षणाच्या विविध स्तरावर मुलींचा सहभाग वाढवणे, साक्षरता प्रसारासाठी प्राथमिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण व प्रशिक्षण या तिन्ही मार्गांचा अवलंब करणे, विद्यार्थ्यांची शाळेतील संख्या व उपस्थिती टिकवणे, शालेय पाठ्यपुस्तकांचे पुनर्विलोकन करणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : २००१ –

१९८६  च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात व त्यावर आधारित  १९९२ च्या सुधारित शैक्षणिक धोरणात नमूद केल्याप्रमाणे दर पाच वर्षांनी शिक्षण पद्धतीचे पुनर्विलोकन करावयाचे होते. त्यानुसार नोव्हेंबर २०००  मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सुधारित अभ्यासक्रम आराखडा तयार केला आणि सप्टेंबर २००१  मध्ये हा अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला. जनतेच्या आशा-आकांक्षा, राष्ट्रा पुढील आव्हाने, संविधानात्मक बाबी, जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्या, बदललेले सामाजिक संदर्भ, विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती इत्यादी बाबींचा विचार ह्या अभ्यासक्रमात केला आहे. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : २०२० – 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बालवाड, अंगणवाडी पासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व स्तरांना लागू आहे. यामध्ये महत्त्वाच्या सूचना म्हणजे पाचवी पर्यंतचे शिक्षण मुलांना शक्यतो मातृभाषेतून मिळावे ही यातील एक महत्त्वाची सूचना आहे. इयत्ता सहावी पासूनच विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण घेता येणार ही महत्वाची बाब आहे.सद्याच्या १० +२ ऎवजी ५+३ +३ +४ असा नवा आकृतिबंध लागू होणार आहे.

*अधिक माहितीसाठी वाचा👇

👉 नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020

इ. स. १९५१  मध्ये भारतात केवळ १८.३ टक्के साक्षरतेचे प्रमाण होते ते २०११ पर्यंत  ७२.९८  टक्के पर्यंत पोहोचले इ. स. २०१०  मध्ये केंद्र सरकारने १४ वर्षांपर्यंतच्या मुला मुलींना शिक्षण मोफत व सक्तीचे केले. त्यामुळे शिक्षण प्रसारास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी सरकारने अंगणवाड्या, बालवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, रात्रशाळा, तंत्र शाळा, औद्योगिक व व्यावसायिक शिक्षणाची केंद्रे, साक्षरता प्रसारासाठी प्रशिक्षण केंद्रे या सर्व संस्थांचे देशभर जाळे उभारले.

प्राचीन काळापासून आजतागायत ज्ञान संपादन,चारित्र्यनिर्मिती, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय भावना व राष्ट्रप्रेम निर्मिती, नैतिक मूल्यांची जोपासना हिच शिक्षणाची  महत्त्वाची  उद्दिष्टे  राहिली  आहेत. पण एकविसाव्या शतकात सत्ता, संपत्ती, रोजगार यांच्या प्राप्तीसाठी शिक्षणास  महत्त्व आल्याने वरील उद्दिष्टे शिक्षणात मागे पडत चालली  आहेत. नोकरी मिळवणे, निर्वाह  चालवणे, करिअर घडवणे, व्यक्तिगत मह त्त्वाकांक्षा पूर्ण करणे इत्यादी उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शिक्षण घेतले जात आहे.

परीक्षेतील गुणांना शैक्षणिक गुणवत्ता मानले जात आहे.  पूर्वी शिक्षण प्रसारासाठी तळमळीने झटणाऱ्या शिक्षणमहर्षीची जागा आज भरमसाठ शिक्षण शुल्क व देणग्या घेणाऱ्या शिक्षण सम्राटांनी घेतली असून त्यांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. जागतिकीकरणात सरकारने शिक्षणावरील अनुदान कमी करून खाजगीकरणावर भर दिल्यामुळे शिक्षण महाग झाले आहे. या सर्व वातावरणात सर्वसामान्य विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

 एकविसाव्या  शतकातील शिक्षणातील बदलते प्रवाह कोणते ?

शिक्षण सर्वच पातळ्यांवर, विविध स्तरावर, विविध क्षेत्रातून बदलत चालले आहे. काळाप्रमाणे जसा समाजात सामाजिक, सांस्कृतिक बदल होत असतो तसा शिक्षणातही बदल घडून येत असतो. तो शिक्षण घेण्याच्या पद्धतीत  तसेच देण्याच्या पद्धतीतही होत असतो. आता दूरसंचार क्षेत्रात खूप मोठी क्रांती घडून आलेली आहे. रेडिओ, टीव्ही, कम्प्युटर, मोबाईल यांच्यात  मोठ्या प्रमाणात बदल घडून आलेत. या सर्व माध्यमांचा शिक्षणातही मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. जागतिकीकरणाच्या  रेट्यात  आपल्याला टिकून राहायचे असेल तर आपल्याला शिक्षणाची एकविसाव्या शतकातील उद्दिष्टे ठरवावी लागतील.

एकविसाव्या  शतकातील शिक्षणाची उद्दिष्टे:

  1.  चारित्र्यसंपन्न नागरिक घडविणे, शिक्षणाप्रती जागृत विद्यार्थी घडवणे.
  2.  शिक्षणाचे करिअर हे ध्येय न होता ज्ञानप्राप्ती अंतिम उद्दिष्ट असावे
  3.  शिक्षण एकांगी न होता ते बहुआयामी हावे.
  4.  शिक्षणाची घसरलेली गुणवत्ता वाढविली पाहिजे.
  5.  शिक्षण चार भिंतीच्या आतून बाहेर पडले पाहिजे. शिक्षण हे पुस्तकातून बाहेर पडून प्रायोगिक झाले पाहिजे.
  6.  विद्यार्थ्यांना उपदेशाचे डोस न देता त्यांच्या शिक्षणाप्रती ओढ निर्माण केली पाहिजे.
  7.  विविध आभासी  गेम्स मधून विद्यार्थ्यांना  बाहेर काढले पाहिजे.
  8.  आपला अभ्यासक्रम आताच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करू शकतो  का याचा शिक्षण तज्ज्ञांनी अभ्यास केला पाहिजे.
  9.  शिक्षणा प्रती आणि  विद्यार्थ्यां प्रती तळमळ असणारे शिक्षक घडवले पाहिजेत.
  10.  ज्ञान हे गुण किंवा मार्कांच्या  आतून बाहेर पडून कौशल्याधारित झाले पाहिजे.
  11.  विद्यार्थी गुण मिळवणारे मशीन असून त्याच्याही  या समाजाकडून  अपेक्षा आहेत याची पालक, शिक्षक आणि समाजात जाणीव निर्माण केली  पाहिजे. विद्यार्थ्यांना अपेक्षांच्या ओझ्यातून  बाहेर काढले पाहिजे.
  12.  विद्यार्थ्यांच्यात  वाढत चाललेली असुरक्षिततेची भावना कमी करून त्यांना विश्वासात घेणारे शिक्षण, विद्यार्थ्यांच्या जगण्यासाठी उपयोगी असे कौशल्य आधारित शिक्षण दिले पाहिजे.
  13.  घोकंपट्टी, कॉपी,पाठांतर या गोष्टी शिक्षणातून हद्दपार झाल्या पाहिजेत.  कला, वाणिज्य आणि विज्ञान या क्षेत्रांचा मेळ शिक्षणातून घालता आला पाहिजे.
  14.  मातृभाषेतून शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे याची जागृती पालक आणि  समाजात निर्माण केली पाहिजे.
  15.  शिक्षणात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार शिक्षणात झाला पाहिजे. 
  16.  मुळात शिक्षणातून गुणांसाठीची रस्सीखेच थांबली पाहिजे, थांबवली पाहिजे. मुलांची नैसर्गिक कुवत  व आवड  लक्षात घेऊन त्यांना शिक्षण दिले पाहिजे.
  17.  पालकांच्या अपेक्षांचे दडपण कमी केले पाहिजे. ‘शिक्षण स्वातंत्र्य‘ ही संकल्पना समाजात रुजविली पाहिजे.
  18.  एकविसाव्या शतकातील आव्हाने पेलू  शकणारे शिक्षण निर्माण केले पाहिजे.
  19.  ब्रिटिशांच्या धरतीचे फक्त कारकून बनवणारे शिक्षण स्वातंत्र्यानंतरही  चालू आहे, ते थांबवले पाहिजे.
  20.  विविध स्पर्धा परीक्षांच्या नावाखाली दहा ते बारा बारा तास चालणारे शिक्षण थांबवले पाहिजे .
     

एकविसाव्या शतकातील भारतीय शिक्षणासामोरील आव्हाने – 

ज्ञानार्जन हा एकेकाळी भारतीय संस्कृतीतील संस्कार होता. ज्ञानार्जन हे पवित्र कार्य समजले जात होते. ही परिस्थिती आता राहिलेय  का हा संशोधनाचा विषय आहे. सध्या ज्ञान देण्यात रस  राहिलाय ना घेण्यात अशीच परिस्थिती काही अपवाद सोडले तर बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. पूर्वीची   शिक्षणाप्रतीची  तळमळ विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही ठिकाणी पाहायला मिळत नाही. याची कारणे काय याचा विचार झाला पाहिजे. सध्याच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात प्रत्येकाच्या राहणीमानात सुधारणा झाली. नवीन नवीन तंत्रज्ञान माणसाला अवगत झाले. प्रचंड माहितीचा ओघ  माणसाच्या हातात येऊन थांबला. मोबाईल मध्ये झालेल्या क्रांतीने जग पूर्णतः बदलून टाकले. सोशल मीडियाचा वापर अतिरेकी प्रमाणात होऊ लागलाय.

या माहिती- तंत्रज्ञानाच्या महापुरात आजची  तरुण पिढी वाहवत चाललेय. ही पिढी भरकटलेल्या अवस्थेत दिशाहीन पणे बावरलेल्या मनस्थितीत फिरत आहे. पिढीच्या पिढी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. असे असताना देशातील पुढारी, नेते, शिक्षणतज्ञ या विषयावर का बोलत नाहीत? या तंत्रज्ञानाच्या महाजालात अडकलेल्या पिढीला या तंत्रज्ञानाचा वापर करूनच का नाही पुन्हा प्रवाहात  आणता येणार?

यासाठी तीव्र इच्छाशक्तीची गरज आहे. राजकीय आणि शैक्षणिक दोन्ही क्षेत्रात ही इच्छाशक्ती निर्माण झाली पाहिजे. ‘काट्याने काटा काढणे’ या उक्तीप्रमाणे आता कार्य करण्याची वेळ आलेली आहे.zoom,google meet, skype यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवले म्हणजे आपण  खूप मोठ्या तंत्रज्ञानाचा वापर  शिक्षणात करतो अशी सध्याची अवस्था आहे. या अपृपातच  शिक्षक, पालक, विद्यार्थी स्वतःचे  समाधान करून घेत आहेत. कोरोना काळात  त्याला पर्यायही नाही. पण  सामान्य परिस्थितीत हे बदलण गरजेच आहे आणि हे बदललं पाहिजे.

करिअर आणि शिक्षणातील आव्हाने आणि संधी

कोरोना नंतर शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले आहेत. स्पर्धेच्या काळात शालेय स्तरापासूनच भविष्यातील करिअर संदर्भात दिशा ठरवावी लागणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले दिसतात. इयत्ता 6 वी पासूनच व्यावसायिक शिक्षणाचा अभ्यासक्रमात अंतर्भाव हा खूपच मोठा बदल आहे. शालेय शिक्षणानंतर खऱ्या अर्थाने करिअरच्या दिशेने आपला प्रवास चालू होतो. आता स्पर्धेच्या काळात एकच पदवी, कॉलेज, खाजगी क्लास या सर्वांवरच अवलंबून राहून चालणार नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी या काळात पुढील गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.

  1.  स्वतः शिकण्याची जिद्द
  2.  नवनिर्मितीचा ध्यास
  3. चांगला कोर्स कॉलेज निवडणे

शिक्षणातील बदलत्या प्रवाहांचा विचार करत असताना विद्यार्थ्यांनी बदलत्या इंडस्ट्रीचा विचार करणे गरजेचे आहे.करिअर निवडताना बेसावध राहून चालणार नाही. आपण कोर्स निवडताना पुढील पंधरा वर्षांचा विचार करावा लागणार आहे. कारण झपाट्याने बदलत चाललेल्या इंडस्ट्रीत आपण कालबाह्य होऊन चालणार नाही. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने केलेल्या सर्वेनुसार बदलत्या स्पर्धेच्या युगात शाळा, कॉलेजमधील ज्ञानावर अवलंबून राहता येणार नाही. त्यांना डोळसपणे सगळ्या गोष्टी स्वतः शिकाव्या लागणार आहेत.

बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यासाठी उपयोगी पडणार नाही. त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. वाढणाऱ्या बेरोजगारीचा दर कमी करायचा असेल तर अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्य आत्मसात केली तर त्यांना त्याचा निश्चितच फायदा होतो. कौशल्य आणि ज्ञान हे देशाच्या आर्थिक वाढीचा आणि सामाजिक विकासाची प्रेरक शक्ती आहेत.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी फक्त इंजिनीरिंग आणि वैद्यकीय क्षेत्राकडे न वळता बाकीच्या पर्यायांकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. जसे की सध्याच्या काळात नॅनो टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन्सिक अकाउंटिंग अशा विविध क्षेत्रात खूपच संधी निर्माण झाल्या आहेत. या क्षेत्रातून विद्यार्थ्यांच्या कलागुणां बरोबरच नवनिर्मितीला ही खूपच वाव आहे. शैक्षणिक वयापासून काळाची पावले ओळखत पाच वर्षानंतर नोकरी मिळवण्यासाठी किती स्पर्धा असेल याचा अंदाज घेत शिक्षणाचा योग्य पद्धतीने अवलंब केला तर अशक्य असे काहीच नाही.

आजची तरुणाई मोबाईल सोशल मीडियावर आपला स्टेटस सतत बदलत असते. खरंतर यामागे वेळ घालवण्यापेक्षा आयुष्याचा स्टेटस बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवा. मुलांना आत्तापासूनच ऑनलाइन वरून ऑफलाइन येत आपल्यातील कौशल्यांचा विकास करायला हवा. तरच या नवीन प्रवाहात या तरुण पिढीचा टिकाव लागू शकतो आणि ते यशाच्या पायऱ्या चढू शकतात.

                                                                                                                                                                                  संदर्भ : दूरशिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ: शिक्षण आणि समाज,एम.ए.भाग-१,कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय.

21 thoughts on “शिक्षणातील बदलते प्रवाह आणि भविष्यकालीन आव्हाने | shikshanatil navin vichar pravah”

  1. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळातील शिक्षण पद्धतीवर लिहिलेला अभ्यासपूर्ण लेख. शिक्षण व्यवस्थेतील अमूलाग्र बदल बदलते विचार प्रवाह वेळोवेळी नेमलेले आयोग, या सर्व गोष्टींची माहिती लेखातून मिळते. खूप अभ्यासपूर्ण लेख आहे

    Reply
  2. अतिशय महत्वपूर्ण लेख आहे.याचा विचार होणे गरजेच आहे

    Reply
  3. Nice & perfect explanation about Indian education system — Ancient, Medieval & Modern. Good, keep it up. Best wishes to your future Goal. Thank you Madam. — Anil Desai.

    Reply
  4. Madamni khupch chhan blog creat kelela aahe… shikshanatil badalte vicharpravah aani aavhane hi mahiti B.edchya Abhyaskramat aaslene mi hi link aamchya B.edchya group var pan share keli hoti tyanchyakadun sudha chhan pratikriya aikayla milaly☺️.. madam ni khupch chhan kam hati ghetle aahe tyanchya ya blogsathi mazyakadun ani mazya B.edchya vidhyarthanchya kadun khup khup subhechya 👍👍

    Reply

Leave a Comment