स्पर्धा परीक्षांचे मृगजळ

स्पर्धा परीक्षांचे मृगजळ

उमेदीची दहा -पंधरा वर्षे

परीक्षा म्हटलं की UPSC,MPSC हीच नावं विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर येतात. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी SET,NET इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी GATE अशा विविध परीक्षा विद्यार्थ्यांसाठी त्या त्या विषयातील graduation, post graduation नंतर देता येतात.

सध्या या परीक्षांची craze एवढी वाटले की या परीक्षांना बसणं म्हणजे त्यांना प्रतिष्ठेचे वाटू लागलय. पालकांना सुद्धा मुलांनी या परीक्षा देऊन ‘साहेब’ व्हावं असं वाटू लागलय. पूर्वी शहरी भागापुरत्या मर्यादित असलेल्या या परीक्षा सध्या ग्रामीण भागात स्थिरावल्या आहेत.

ग्रामीण भागात करिअरच्या संधी नसतात, त्यातच न परवडणारी शेती, विविध कोर्स करण्यासाठी लागणारे पैसे शेतकरी आई-वडिलांना न परवडणारे, त्यातच या परीक्षा केवळ बीए, बीकॉम, बीएस्सी करून देता येतात. या सर्वांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ओढा या परीक्षेकडे लक्षणीय आहे.

त्यातच या परीक्षा पास झाल्यानंतर समाजात वाढणारी प्रतिष्ठा, मानसन्मान, त्याच बरोबर बदललेली लाइफस्टाइल या तरुण विद्यार्थ्यांच्या नजरेत भरते व ‘स्पर्धा परीक्षेत यश’ हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय बनुन जातं. ही मुलं मग रात्रंदिवस झपाटून अभ्यासाच्या मागे लागतात. स्वतःच्या झोपल्यावर, खाण्यापिण्यावर. निर्बंध घालतात. उमेदीची दहा -पंधरा वर्षे चुकीच्या मार्गाची निवड केल्यामुळे वाया घालवतात. मला खूप वाईट वाटतं या आजच्या तरुण पिढी कडे बघून.

आपला देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. कारण एकूण लोकसंख्येच्या 51 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या एक क्रियाशील वयोगटातील आहे. वृद्धांचे प्रमाण 12 टक्के च्या आसपास आहे. यामुळे आपल्या देशाला या तरुण पिढीचा उपयोग देशाच्या विकासासाठी खूपच महत्त्वाचा आहे. अब्दुल कलाम यांनी या तरुण पिढीसाठी खूप स्वप्न पाहिली होती. हीच तरुण पिढी आज आपल्या ऐन उमेदीच्या काळात स्पर्धा परीक्षांच्या मृगजळात अडकली आहे.

मग या परीक्षा देऊ नयेत का? स्पर्धा परीक्षेंनाबसावे की बसू नये ?या परीक्षा अयोग्य आहेत असं नाही किंवा विद्यार्थ्यांनी या परीक्षांकडे वळूच नये असही नाही. मग काय करावं ?खरं तर या परीक्षा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी चालू केल्या त्या त्यांच्या कारभारात त्यांना उपयोगी माणसे मिळण्यासाठी. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही त्या आपल्या सरकारने चालू ठेवल्या. यातून ज्ञानेश्वर मुळे, विश्वास नांगरे – पाटील यांच्यासारखे अनेक अधिकारी प्रशासनाला लाभले. या परीक्षांचे वलय विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाले.

असे म्हणतात कि प्रत्येक व्यक्ती जन्मतः विशेष गुण घेऊन किंवा कौशल्य घेऊन जन्माला आलेली असते. मग असं असताना स्वतःमधील talent कोणते आहे हे न ओळखता प्रत्येकाने या परीक्षेत प्रावीण्य मिळवून ‘साहेब’ होण्याचे ध्येय कशाला ठेवावे ? आपल्या समोर एवढाच मार्ग शिल्लक आहे का याचाही विचार केला पाहिजे. समाजात अशी कितीतरी उदाहरणे आहेत ज्यांनी वेगळ्या वाटेने यश, कीर्ती संपादन केली. मग आपण का करू शकत नाही.

सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, सध्याच्या काळातील उद्योजक इलॉन मस्क, ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा अशी कितीतरी नावे घेता येतील त्यांचा आदर्श आताच्या तरुणांना डोळ्यासमोर ठेवावा. यासाठी ही सर्व मंडळी स्पर्धा परीक्षा देऊन साहेब होण्याचा मागे लागली नाहीत. त्यांनी स्वतः मधील skill किंवा कौशल्य ओळखली आणि त्यांचा विकास केला.

त्यासाठी त्यांनाही खूप मेहनत घ्यावी लागली. कोणतेही ध्येय गाठण्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतात. पण चुकीच्या मार्गाने केलेले कष्ट आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जात नाहीत. यासाठी योग्य मार्ग निवडला आणि मग तो मार्ग काढण्यासाठी मेहनत घेणे यातच यशाचे रहस्य लपलेलं असतं.

स्पर्धा परीक्षेतील निर्माण झालेली लॉबी

स्पर्धा परीक्षा वर्षभर घेतल्या जातात. या परीक्षा विविध विभागांसाठी वेगवेगळ्या घेतल्या जातात. जवळपास प्रत्येक मुलगा किंवा मुलगी त्यामधील दोन किंवा तीन वेगवेगळ्या परीक्षांना बसण्यासाठी पात्र असतात. त्यामुळे या परीक्षेची जाहिरात निघाली की पात्र असलेल्या सर्व परीक्षांचे forms मुले भरतात. मग त्या त्या विषयांचा झपाटून अभ्यास करतात. अगदी तहान-भूक विसरून रात्रंदिवस अभ्यास करतात. वेगवेगळे क्लासेस जॉईन करतात. क्लासेसची प्रचंड फी सगळ्यांनाच परवडते असे नाही.

तरीही अशा मुलांचे आई वडील काबाड कष्ट करून प्रसंगी जमीन गहाण ठेवून क्लासेसची फी भरत असतात. जागा ३५ कधी ५0 कधी ६0 ,६५ अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे ११५,२२0 आणि ही मुलं लाखोंच्या संखेन फॉर्म भरतात. प्रत्येक फार्मसी फी हजाराच्या घरात असते.

मग वर्षभराच्या परीक्षांमधून जमा होणारी कोट्यावधींचे फी कोणत्या कारणासाठी घेतली जाते? त्यापैकी एक टक्का सुद्धा जॉब या मुलांना दिला जात नाही. त्यातच स्पर्धा परीक्षांच्या नावावर खोऱ्याने पैसा ओढणारी क्लासेस नावाची दुकान तर गल्लोगल्ली पाहायला मिळतात.

परीक्षा राबवणारी व्यवस्था आणि त्या परीक्षांच्या नावाने चालणारे क्लासेस यांची एक लॉबीच समाजात तयार झालेली आहे. त्यांना स्पर्धा परीक्षांच्या नावाचं मोकळ कुरणच मिळालेल आहे. या कुरणाला आपणच खतपाणी घालत आहोत. आपल्या आई-वडिलांनी कष्टाने जमा केलेली आयुष्याची पुंजी आपमतलबी मुठभर लोकांच्या पायावर ठेवत आहोत.

पण हे सर्व आपण का कशासाठी करत आहोत याचा विचार आपण कधी केलाय का ? आपण करतोय हे योग्य आहे का ? आपला मार्ग योग्य आहे का ? आपल्यातली कौशल्य किंवा skills आपण ओळखली आहेत का ? आपलं ध्येय कोणत आहे, आपली आवड काय आहे याचा आपण प्रामाणिकपणे विचार केलाय का ?

हे लिहिण्यामागे स्पर्धा परीक्षां बद्दल कोणताही गैरसमज आहे असं नाही तर त्यामागे सामाजिक वास्तवतेचे भान आहे. स्पर्धा परीक्षांबद्दल आपल्या सर्वांच्या मनात असणार आकर्षण हे मृगजळ आहे. ज्याच्या पाठी मागे धावण्यात आपण आपली महत्त्वाची उमेदीची वर्षे वाया घालवतो. कारण आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला करण्यासारखं बरंच आहे. तुम्ही समाजाची गरज ओळखून त्यानुसार स्वतःला जर develop केलं तर तुम्हाला रोखणार कुणीच नसेल.

सध्याच्या पिढीचा रोल मॉडेल ‘इलोन मस्क’ चा विचार करा. तो स्पर्धा परीक्षांच्या मागे लागून सरकारी नोकरीची वाट पाहत बसला असता तर तो कुठे असतात ? सर्वांनाच ‘इलोन मस्क’ होता येणार नाही, पण तुम्ही तुमच्या ज्या – त्या क्षेत्रात तुमचं नाव करू शकता.

मात्र त्या क्षेत्रात सुरुवात करताना कोणत्याही कामाची लाज वाटून न घेता सुरुवात करा. त्या कामाशी प्रामाणिक राहा. अगदी झेरॉक्स मशीन घालून सुद्धा तुम्ही त्यात पुढे जाऊ शकता. जेवढे कष्ट स्पर्धा परीक्षांसाठी घेता तेवढेच तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी द्या. वयाच्या ३८,४० वर्षांपर्यंत परीक्षा देत बसण्यात काही शहाणपण नाही. अर्ध आयुष्य आपण वाया घालवणं हा आपलाच मूर्खपणा आहे.

स्पर्धा परीक्षा कोणी द्याव्यात ?-

ज्याला स्पर्धा परीक्षा देऊन आपलं करिअर करायचेय त्या सर्वांनी स्पर्धा परीक्षा द्याव्यात, पण सुरुवातीच्या दोन-तीन वर्षेच. पहिल्या एक दोन परीक्षा परीक्षेचे स्वरूप, प्रश्नांचे स्वरूप, त्यांची खोली, वेळेचे नियोजन हे समजण्यातच जातात. त्यानंतर आपण बऱ्यापैकी परीक्षांना सामोरे जाण्यासाठी prepare होतो. यावेळी परीक्षेना सामोरे जाताना आपण स्वतःलाही तपासले पाहिजे. आपण आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.

आपण खरोखरच यात यशस्वी होणार याची खात्री वाटत असेल तरच पुढे प्रयत्न करत राहावे. तरीही दोन किंवा जास्तीत जास्त चार वर्षांचे टार्गेट ठेवून या परीक्षांना सामोरे जावे . जर ठेरवलेल्या टाईम लिमिट मध्ये म्हणजेच वर्षांमध्ये झालं नाही तर सरळ तो मार्ग सोडून द्यावा. स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना सुरुवातीलाच आपण आपला दुसरा पर्याय तयार ठेवला पाहिजे.

कारण हा मार्ग सोडून दुसऱ्या मार्गावर जाताना तो कोणता हे पण आपल्याला माहीत असले पाहिजे. नाहीतर आपण भरकटण्याचीच शक्यता असते. या वळणावर जर आपण भरकटलो तर परत पूर्वपदावर येणे खूप अवघड असते. आपली उमेदीची वर्षे वाया जातात. यासाठीआपण आपला दुसरा पर्याय तयार ठेवावा.

वयाची अट शिथिल करणे योग्य आहे का ?

आपण सरकारच्या पाटी लागतो वयाची अट शिथिल करावी म्हणून. पण यात नुकसान आपलेच होते. आपण मात्र वयाची मर्यादा संपेपर्यंत परीक्षांना बसत राहतो. याचा फायदा परीक्षा घेणाऱ्यांचा किंवा क्लासेस वाल्यांचा होतो. त्यासाठी आपण वेळीच जागे झालो पाहिजे. ३८, ४० वर्षे वयापर्यंत जर आपण settle नाही झालो तर त्यानंतर आपण करणार काय ? यासाठी फक्त स्पर्धा परीक्षा हा योग्य मार्ग नाही. आपल आयुष्य आपणच घडवन आपल्या हातात आहे.

पर्याय दुसरा निवडला तर केलेल्या अभ्यासाचा फायदा काय ? –

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास खूप खोलवर असतो. त्यांचा syllabus, त्यांचे topics, खूप deep असतात. या परीक्षा देताना आपण प्रत्येक topic चा सर्वांगाने अभ्यास केलेला असतो, पेपर सोडवण्यासाठी वेळेचे नियोजन केलेले असते,अभ्यासाचे टाईम टेबल ठरवलेली असते, अभ्यासासाठी बर्‍याच इतर गोष्टींना मुरुड घातलेली असते.

या सर्वांमुळे स्वभावात एक शिस्त तयार झालेली असते. आपण जेव्हा दुसरा पर्याय निवडतो तेव्हा त्या वळणावर या शिस्तीचा उपयोग होतो.बऱ्याच विषयांचा अभ्यासामुळे सामान्य ज्ञानात भर पडलेली असते. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढलेला असतो. याचा उपयोग आपल्याला आपण निवडलेल्या दुसऱ्या पर्यायावर पुढील वाटचाल करण्यासाठी उपयोगी ठरतो.

स्पर्धा परीक्षा बंद झाल्या तर ?-

स्पर्धा परीक्षा बंद केल्या तर सर्व प्रश्न सुटतील हा गैरसमज आहे. कारण स्पर्धा परीक्षा ही समस्या नाहीये. समस्या आहे ती आपल्या शिक्षण पद्धतीत आणि ती राबवणाऱ्या शैक्षणिक संस्थांत. ग्रॅज्युएशन पर्यंत आपली शिक्षण पद्धती कुणालाही कौशल्याभिमुख (skill based) शिक्षण देत नाही.

जीवनाला उपयोगी कौशल्य विकसित न झाल्यामुळे ही मुले दिशाहीन होतात आणि मग स्पर्धा परीक्षांच्या मागे लागतात. पण अगोदरच शालेय स्तरापासून skill based शिक्षण देणारी शिक्षण प्रणाली असेल तर मुले त्यांच्या अंगभूत गुणांच्या विकासाला प्राधान्य देतील आणि त्यात ती यशस्वी होतील आणि महत्त्वाचे म्हणजे त्यात त्यांना खरा आनंद मिळेल.

19 thoughts on “स्पर्धा परीक्षांचे मृगजळ”

  1. लेख पूर्ण वास्तववादी आहे ,छान मांडणी केली आहे

    Reply
  2. खुप छान लेख . फक्त समस्याच नाही मांडली तर त्यावर उपाय ही आपण सांगितले आहेत . अभ्यासपूर्ण मांडणी .

    Reply
  3. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणारा पैसा व प्राप्त होणारे वलय यामुळे युवकांच्या मध्ये स्पर्धा परीक्षांचे आकर्षण खूप मोठ्या प्रमाणात आहे. मुळात शिक्षणाचा उद्देश हा मुख्यत्वे करून नोकरी हाच असल्यामुळे थोडा वेळ का लागेना मात्र पैसा न भरता नोकरी लागेल या अपेक्षेने गोरगरीब गुणवंत विद्यार्थी यांच्याकडे आकर्षिले जात आहेत, व्यवसायासाठी पैसा आवश्यक, दुर्दैवाने आज नोकरी मिळवण्यासाठी तर तो अतिआवश्यक अशा अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच गाजर विलोभनीय न वाटलं तर नवलच. आपण एक मस्क व त्यांची टेस्ला, एक बेझोस व त्यांनी उभा केलेल ॲमेझॉनचे मायाजाळ पाहतो तसेच एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण नियमितपणे देतो. पण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आयुष्य मातीमोल केलेले हजारो उद्योजक वैज्ञानिक सुद्धा असणार पण ते आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे येथील परिस्थिती स्पर्धापरीक्षा पेक्षा वेगळी नाही. फक्त उद्योजक स्वतःच्या नशिबाला दोष देऊन गप्प राहतो व स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थ्याला अथवा समाज म्हणून आपणास दोष दोष माथी फोडण्यासाठी सरकार आहे. त्यामुळे व्यवसाय व स्पर्धा परीक्षा या दोन्हींची तुलना करता चित्र वेगळं असं मला वाटत नाही. बाकी आपण आपलं मत प्रदर्शन छान पद्धतीने केला आहे. अभिनंदन व भावी लिखाणासाठी शुभेच्छा.

    Reply
  4. खूप छान लेख आहे सध्या जे वास्तव चालू आहे त्यावर मॅडम नी खूप अभ्यास पूर्वक लेखाची मांडणी केली आहे. खरंच जे विद्यार्थी अशा स्पर्धेच्या मागे लागले आहेत त्यानी आपली क्षमता ओळखून वेळीच सावध झाले तर बर होईल कारण या जगात खूप काही शिकण्यासारखे व करण्यासारखी वेगवेगळी क्षेत्र आहेत .त्यातून ही आपण आपले करिअर करू शकतो. आजच्या विद्यार्थीना खूप काही शिकण्यासारखा व बोध घेण्या सारखा हा लेख आहे. खूपच छान माहिती. 🙏🏻👌👌

    Reply
  5. खूपच अनमोल मार्गदर्शन, अभ्यासपूर्ण मांडणी, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ही माहिती दीपस्तंभ नक्कीच ठरेल

    Reply
  6. खुप सुंदर आणि वास्तववादी लेख लिहिला आहे

    ८८५६००२२८०

    Reply

Leave a Comment