माझा आवडता खेळ बॅडमिंटन
‘खेळ’ म्हटलं की सर्वांनाच एक नवी चेतना निर्माण झाल्यासारखं वाटतं. लहान-थोर सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या खेळाची आवड असतेच. जन्मल्या पासूनच खेळाचं आपल्याशी एक वेगळच नातं निर्माण झालेलं असतं. माणसाच्या जीवनात खेळाला अनन्य साधारण महत्व आहे. खेळामुळे माणसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. मैदानी खेळांचे महत्त्व तर इतर खेळांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. मैदानी खेळामध्ये फुटबॉल, टेनिस, खो-खो, कबड्डी असे अनेक खेळ येतात. यापैकी एक महत्त्वाचा आणि प्रसिद्ध खेळ म्हणजे ‘बॅडमिंटन’.
बॅडमिंटन खेळ तसा फार प्राचीन नाही. खेळाचे नियम सुद्धा साधे-सोपे असल्याने गल्ली-बोळात, टेरेसवर, अंगणात कुठेही, हा खेळ खेळता येऊ शकतो. हा खेळ शटलकाॅक म्हणजे कार्क पक्षांच्या पंखांपासून तयार केलेले फूल आणि रॅकेट यांच्या सहाय्याने खेळला जातो. यामध्ये मैदानाच्या दोन्ही बाजूंना एक-एक खेळाडू याला ‘सिंगल्स’ तर मैदानाच्या दोन्ही बाजूंना दोन-दोन खेळाडू सहभागी असतात त्या खेळाला ‘डबल्स’ म्हणतात. या खेळाला ऑलिंपिक मध्येही स्थान देण्यात आले आहे
मला हा खेळ खूप आवडतो. हा खेळ खेळल्यामुळे मला खूप उत्साही वाटते. मी २०१२ मध्ये झालेला साईना नेहवाल यांचा ऑलिंपिक मधील सामना आणि २०१६ मध्ये पी.व्ही.सिंधू यांचा सामना बघितला होता. तेव्हापासूनच मला बॅडमिंटनची आवड निर्माण झाली. किदांबी श्रीकांत, ज्वाला गट्टा, पुलेला गोपीचंद, प्रकाश पदुकोण अशा महान खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, करतही आहेत. या सर्वांच्यामुळे मला पण बॅडमिंटन या खेळाची आवड निर्माण झाली. या खेळामुळे शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य सुधारते. पायातील स्नायू बळकट होतात. बॅडमिंटन खेळताना इकडून-तिकडे सारखी हालचाल करावी लागत असल्यामुळे शारीरिक चपळता वाढते.
त्यामुळे शरीराची लवचिकता वाढते. या खेळामुळे माणसिक ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. या खेळात शरीराचा फीटनेस ठेवण्यासाठी व्यायाम करावा लागतो. त्यामुळे शरीराला आणि मनाला ताजेतवाने रहाण्यास मदत होते. भारतात क्रिकेट जास्त लोकप्रीय आहे. तरीही बॅडमिंटनची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढतच चाललेय. मला तर सकाळी लवकर उठून बॅडमिंटन खेळायला खूप आवडते. मी बॅडमिंटनचा क्लास पण जाॅईन केलाय. मला माझ्या बाबांनी बॅडमिंटन साठी लागणारे सर्व साहित्य आणुन दिले आहे. त्यामुळे मी खूप खूष आहे.
बॅडमिंटनचे नियम सोपे असले तरी त्यामध्ये कौशल्य प्राप्त करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मला तर पी.व्ही. सिंधू प्रमाणे ऑलिंपिक मध्ये पदक मिळवण्याचे स्वप्न आहे. यासाठी मी दररोज सराव करते. माझा अभ्यास सांभाळून मला याचा सराव करता येतो.त्यामुळे जास्त ताण पण येत नाही. मला माझा छंद म्हणजेच बॅडमिंटन खेळण्याचा मनमुराद आनंद घेता येतो. अभ्यास आणि खेळ दोन्हीला मला योग्य वेळ देता येतो.त्यामुळे अभ्यासातही खंड पडत नाही. परिणामी आई-बाबांचा पण याला विरोध नाही. या सर्वांमुळे मला बॅडमिंटन हा खेळ खूप आवडतो.