कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान

कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान

‘विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती,
म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची,
जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली,
म्हणून नाही खंतही तिजला मरावयाची!

अशी स्वतःच्या काव्याची समीक्षा करणारे कुसुमाग्रजच! खरतर कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान यावर मी लिहावं एवढी मी मोठी नाही, म्हणण्यापेक्षा माझी ती योग्यताच नाही. तरीही माझे काही विचार मांडण्याची माझी इच्छा आहे. कारण मी शाळेत असताना कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता आम्हाला अभ्यासाला होती. ती कविता मला त्यावेळेस ही भावली होती. पण वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ती मला अधिकाधिक समजत गेली. ती कविता माझी सर्वात आवडती कविता बनली. यामुळेच मला कुसुमाग्रजांच्या बद्दल जास्त जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि हळुहळु कुसुमाग्रज त्यांच्या कवितेतून, तर कधी नाटकातून अधिकाधिक उलगडत गेले,समजत गेले.

हे पण वाचा : माझा आवडता कवी : ‘कुसुमाग्रज’, मराठी निबंध

कुसुमाग्रज म्हणजे मराठी साहित्य विश्वाला लाभलेले एक वरदानच म्हणता येईल. प्रतिभावंत कवी, श्रेष्ठ कादंबरीकार, लेखक, नाटककार, ललित साहित्यकार, समीक्षक अशा साहित्याच्या सर्व अंगांना वि. वा. शिरवाडकर यांनी स्पर्श केला. त्यांच्या कविता अबालवृद्धांना आपल्याशा वाटल्या. त्यांच्या साहित्यात स्पष्टपणा होता, जोश होता आणि सौंदर्य ही होते. त्यांच्या कवितेत कारुण्य, सौंदर्य, प्रेम, आपलेपणा जाणवतो.

‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ ला पुण्यात  झाला. त्यांचे मूळ नाव ‘गजानन रंगनाथ शिरवाडकर’ असे होते. लहान असताना त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतले, त्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले. कुसुमाग्रज यांचे वडील वकील होते. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहिणी होती. ती सर्वांची लाडकी होती. कवी वि.वा. शिरवाडकर यांनी कुसुमचा मोठा भाऊ अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ हे नाव धारण केले. तेव्हापासून कवी विष्णू वामन शिरवाडकर हे कवी ‘कुसुमाग्रज’ या टोपणनावाने ओळखले जाऊ लागले.

हे पण वाचा: # स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: मराठी निबंध

हे पण वाचा 👉 चांद्रयान-3, एक अवकाश सफर

हे पण वाचा : मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध

मराठी निबंध : माझी शाळा मराठी निबंध

१९३० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ‘काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात’ त्यांनी भाग घेतला होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांच्या पर्वाला या लढ्यापासूनच सुरुवात झाली असे म्हटले जाते. त्यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून दलित चळवळीला पाठिंबा दिला. समाज सुधारणांसाठी पुढाकार घेतला.
‘पुरे जाहले चंद्र तारे… आता भिल्लांसारखं प्रेम करा रे’! असं म्हणून नव्या पिढीला त्यांनी प्रेम करायला शिकवले, तर आपल्या ‘अखेर कमाई’ या कवितेतून पुतळ्यांनाही बोलतं केलं. स्वातंत्र्योत्तर काळात महापुरुषांचे पुतळे त्यांच्या अनुयायांनी मोठ्या उत्साहाने उभे केले. पण त्या पुतळ्यांच्या व्यथा मात्र कुसुमाग्रजांनाच दिसल्या.

ज्योतिबा म्हणाले शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा,
शिवाजी राजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा,
आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा,
टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा,
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले,
तरी तुम्ही भाग्यवान

एक एक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती!

या कवितेत आजची खरी वस्तुस्थिती कवीने व्यक्त केली आहे. या महापुरुषांचे कार्य कधी आपल्याला समजलंच नाही. आपण फक्त जयंत्या,पुण्यतीथ्याच साजऱ्या करत राहिलो. आणि हीच खूप मोठी शोकांतिका आहे. त्यांच्या बऱ्याच लेखनातून सामाजिक न्याय आणि समाजाच्या उन्नतीसाठी चिंता दिसून येते.

हे पण वाचा : माझी आई मराठी निबंध

हे पण वाचा 👉 नवीकरणीय/अक्षय ऊर्जा संसाधनांचे वाढते महत्त्व मराठी निबंध

हे पण वाचा : माझा आवडता कवी : ‘बालकवी’

खऱ्या अर्थाने मराठी कवितेचे आधुनिकीकरण कुसुमाग्रजांनी केलं. मराठी साहित्यात त्यांनी नवीन विषय, नवीन रूपे आणली. सामाजिक समस्या, देशभक्ती, निसर्ग, प्रेम अशा विविध विषयावर त्यांनी कविता लिहिल्या, लेखन केलं. त्यांनी कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघु निबंध, समीक्षा असे साहित्याचे विविध प्रकार हाताळले. त्यांच्या साहित्यात समाजाबद्दल एक प्रामाणिक आस्था दिसते, क्रांतिकारी वृत्ती दिसते.

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा सरसावूनी उठले शेले,
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत,

वेडात मराठे वीर दौडले सात!

 

१६७४ साली स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर आणि सहा मराठे सरदार यांनी गाजवलेल्या शौर्याच्या प्रसंगावर आधारित हे काव्य मराठी मनाला खडबडून जागं करतं. तर ‘घृणास्पद’ या त्यांच्या कवितेत त्यांची समाजा प्रति असलेली तळमळ आणि चिंता दिसून येते. तर दुसरीकडे सहज सुंदर शब्दात ते पुरात सर्वस्व गमावलेल्या युवकाचे चित्रण अतिशय मार्मिकपणे करतात. या कवितेत त्या युवकाची कुठेच  असहाय्यता दिसत नाही, तर कठीण प्रसंगातही उभे राहण्याची त्याची जिद्द, त्याचा प्रामाणिकपणा आपल्याला प्रेरणा देऊन जातो.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,

‘पैसे नकोत सर’,जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,

पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!


कवितेच्या या ओळी वाचतात अंगावर रोमांच उभे राहतात. कठीण प्रसंगातही पुन्हा उभारण्याचं बळ देऊन जातात.
‘कोलंबसचे गर्वगीत’ या कवितेत ते म्हणतात…

‘चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती,
कथा या खुळ्या सागराला
अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा,
किनारा तुला पामराला!

या कवितेचा नायक ख्रिस्तोफर कोलंबस अखिल मानव जातीचा प्रतिनिधी आहे. निसर्ग आणि मानव त्यांचा संघर्ष खूप जुना आहे. या कवितेत खूप बिकट परिस्थिती असतानाही खलाशी आपले मनोबल खचू देत नाही. उलट तो समुद्र रुपी निसर्गाला आव्हान करतो, ‘तू मला थांबवू शकत नाहीस. अरे आमची ध्येयासक्ती अनंत आहे आणि आमच्या आशाही अनंत आहेत. त्यांचे मोजमापच नाही. पण किनारा मात्र तुलाच पामराला. मानवाच्या या  दुर्दम्य इच्छाशक्तीमुळेच आज मानव चंद्रावर जाऊन पोहोचला.

आपल्या काव्यातून कुसुमाग्रज, कधी कोलंबस होऊन सागराला आव्हान देतात, तर कधी तरुणांना प्रेम कसं करावं हे शिकवतात. कधी शौर्य गीत गातात, तर कधी निसर्गाच्या कोपामुळे सर्व काही हिरावलेल्या तरुणालाही ताठ कण्यानं उभारताना त्याचा स्वाभिमान जपतात. त्यांची नाटकं सुद्धा समाज मनाचा वेध घेणारी होती.

त्यांनी नटसम्राट सारखे अजरामर नाटक  लिहिले. या नाटकाला विविध थरातील, विविध वयोगटातील रसिक प्रेक्षकांनी उचलून धरले. खरंतर या नाटकात नाटकासाठीचे भव्यदिव्य स्टेज नाही, त्याला संगीत नाही, की पात्रांच्या अंगावर भरजरी कपडे नाहीत. किमती दाग दागिने नाहीत, लाइटिंग चा  झगमगाठ नाही. तरीही हे नाटक प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते. यातच या नाटकाच्या यशाचे गुपित आहे. अशी अनेक नाटके त्यांनी लिहिली.

आपल्या  प्रत्येक नाटकात ते समाजाला एक संदेश देऊन जातात. वाङ्मयीन गुणवत्ता हा चांगल्या नाटकाचा पहिला निकष आहे. ‘नाटक म्हणजे प्रेक्षकांचे लक्ष बांधून ठेवणारे, त्यांचे रंजन करणारे, स्टेजवर उभारलेले केवळ एक यांत्रिक व तांत्रिक बांधकाम नव्हे’ असे कुसुमाग्रज म्हणतात. लेखकाला नाटक व्यक्तीत, माणसाच्या स्वभावधर्मात, त्याच्या संघर्षात सापडते, असे ते म्हणतात. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक नाटकात समाज मनाचे प्रतिबिंब दिसते.

कुसुमाग्रजांनी त्यांच्या साहित्यकृतीतून  सामाजिक अन्याय, विषमता या विषयावर जाणीव जागृती करण्याचे कार्य केले. आणि एवढ्यावरच न थांबता ते प्रत्यक्ष अनेक सामाजिक चळवळींमध्ये, सत्याग्रहांमध्ये सहभागी झाले. १९३० मध्ये वयाच्या आठराव्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. १९३३ मध्ये ‘ध्रुव मंडळा’ची स्थापना केली. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी  पुढाकार घेतला. त्यांनी १९५० मध्ये नाशिक येथे ‘लोकहितवादी मंडळा’ची स्थापना केली. नाशिकच्या प्रसिद्ध सार्वजनिक वाचनालयाचे ते १९६२ ते १९७२ पर्यंत अध्यक्ष होते. त्यांच्याकडे कोणीही, कधीही मार्गदर्शनाच्या अपेक्षेने आला, तर त्यांनी त्याला कधीच माघारी पाठवलं नाही. त्यांच्या परीनं ते प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत असत. पण ते कोणत्याही परिस्थितीत प्रसिद्धीसाठी पुढे आले नाहीत.

अशा या साहित्यिकाने मराठी मध्ये अजरामर अशा साहित्यकृती निर्माण केल्या. त्यांना महाराष्ट्र सरकारच्या, भारत सरकारच्या विविध पुरस्कारांनी  सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या ‘नटसम्राट’ या नाटकाला १९७४ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांना १९८७ साली ‘ज्ञानपीठ’ हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘विशाखा’ या कवितासंग्रहासाठी मिळाला आहे. साहित्य क्षेत्रातील योगदाना बद्दल भारत सरकारचा ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार १९९१ साली मिळाला आहे. त्यांना  मिळालेल्या अशा विविध पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे.

त्यानी आपल्या विविध साहित्य कृतींतून भविष्यातील आशावाद व्यक्त केला आहे. त्यांच्याच एका कवितेत ते म्हणतात..

कशास आई भिजवीसी डोळे उजळ तुझे भाळ,

रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल,

सरणावरती आज आमची पेटतात प्रेते,

उठतील त्या  ज्वालातून भावी क्रांतीचे नेते!

Leave a Comment